नियम मोडणाऱ्या भाईंदरच्या महिला उपनिरीक्षकास ७०० रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 01:50 AM2020-02-05T01:50:54+5:302020-02-05T01:51:26+5:30

दुचाकीवर मोबाइलचा वापर, हेल्मेटही नव्हते घातले

Bhayandar's female deputy inspector fined Rs 700 | नियम मोडणाऱ्या भाईंदरच्या महिला उपनिरीक्षकास ७०० रुपयांचा दंड

नियम मोडणाऱ्या भाईंदरच्या महिला उपनिरीक्षकास ७०० रुपयांचा दंड

Next

मीरा रोड : रस्ता सुरक्षा सप्ताह पोलिसांनी नुकताच आयोजित करुन नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे धडे दिले असताना, भाईंदर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा पाटील मात्र दुचाकीवर विनाहेल्मेट मोबाईलवर बोलत चालल्या असल्याच्या तक्रारीवरुन वाहतूक पोलिसांनी त्यांना ७०० रुपयांचा दंड ठोठावला.

ठाणे ग्रामीण पोलीसांच्यावतीने नुकताच रस्ते सुरक्षा सप्ताह पाळण्यात आला. अपघात टाळण्यासह वाहतुकीचे नियम - शिस्त पाळण्याचे आवाहन पोलिसांनी यावेळी केले. त्यासाठी जनजागृतीही केली गेली. पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनीही शिस्त पाळण्याबाबत आवाहन केले होते. महत्वाचे म्हणजे, पोलिसांनादेखील पत्रक काढून वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळण्यास सांगण्यात आले होते.

हेल्मेट वापरा, पोलीस खात्याचा लोगो लावू नका, गाडीच्या काळ्या फिल्म काढा आदी सूचना पोलिसांनादेखील देण्यात आल्या होत्या. या रस्ते सुरक्षा सप्ताहचे फलक अद्याप कायम असतानाच, भाईंदर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा पाटील या सोमवारी भाईंदरमध्ये दुचाकीने जात असताना विनाहेलमेट तर होत्याच, पण चक्क एका हाताने गाडी चालवत एका हाताने मोबाईलवर बोलतही होत्या.

नागरिकांना वाहतूक नियमांचे धडे देणारे पोलीसच वाहतूक नियमांच्या चिंधड्या उडवत असल्याचे पाहून सूनिल कदम या तरुणाने त्याचे छायाचित्रण केले. याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच वाहतूक शाखेकडे त्यांनी केली. कदम यांच्या तक्रारीवरुन वाहतूक पोलिसांनी मनिषा पाटील यांना विनाहेल्मेटसाठी ५०० रुपये व मोबाईलवर बोलत वाहन चालवल्याबद्दल २०० रुपये असा ७०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ठाणे ग्रामीण वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी तक्रार व त्यातील छायाचित्रावरुन मनिषा पाटील यांना दंड ठोठावल्याचे सांगितले. दंड भरण्याबाबत पाटील यांना भार्इंदर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्या मार्फत निरोप दिल्याचे ते म्हणाले.

Web Title: Bhayandar's female deputy inspector fined Rs 700

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.