भाईंदर मेट्रोच्या कामाला १५ ऑगस्टपूर्वी प्रारंभ - प्रताप सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 01:34 AM2019-06-28T01:34:02+5:302019-06-28T01:34:22+5:30
गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीनंतर मीरा-भार्इंदर मेट्रोचे काम मंजूर होऊन पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले असले, तरी त्याचे काम मात्र अजून सुरू झालेले नाही.
मीरा रोड - गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीनंतर मीरा-भार्इंदर मेट्रोचे काम मंजूर होऊन पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले असले, तरी त्याचे काम मात्र अजून सुरू झालेले नाही. मेट्रोचे काम प्रत्यक्षात सुरू करावे, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असता एमएमआरडीएकडून १५ आॅगस्टपूर्वी कामाचा प्रारंभ होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
दहिसर पूर्वेला चेकनाक्यापर्यंत येणारी मेट्रो मीरा-भार्इंदरमध्ये यावी तसेच काशिमीरावरून ती ठाणे मेट्रोला जोडावी, अशी मागणी सरनाईक यांनी गेल्या अनेक वर्षांपासून चालवली आहे. सरकार आणि एमएमआरडीएकडे सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा करतानाच विधिमंडळाच्या अधिवेशनात आंदोलने, प्रश्न मांडले आहेत.
मुख्यमंत्र्यांनीही २०१७ च्या महापालिका निवडणुकीत मेट्रो मंजुरीचे आश्वासन दिले होते. पण, अंदाजपत्रकात नसलेली तरतूद आणि मेट्रोमार्ग जाहीर न केल्याने सरनाईक आदींनी निवेदनांसह याविरोधात होळी, दहीहंडी, दिवाळी आदी दिवशी आंदोलने केली होती. अखेर, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या अनेक प्रकल्पांच्या भूमिपूजनांमध्ये मीरा-भार्इंदर मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन उरकण्यात आले होते.
शिवसेनेने मीरा-भार्इंदर मेट्रोची नुसती मागणीच नाही, तर त्याचा सतत पाठपुरावा केल्याने प्रशासकीय पातळीवर हे काम अंतिम टप्प्यात आले. मात्र, जागेवर मेट्रोचे काम सुरू होत नसल्याने विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले.
मेट्रोसाठी पाठपुरावा केला असून हा आपला तसेच शहरवासीयांच्या स्वप्नातील प्रकल्प असल्याने काम तत्काळ सुरू करण्याची मागणी केली.
कंत्राटदार निश्चित करणार
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानंतर एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी यांनी मीरा-भार्इंदर मेट्रोमार्गाचे काम करण्यासाठी १५ जुलैपर्यंत कंत्राटदार निश्चित करून १५ आॅगस्टआधी काम सुरू केले जाईल, अशी माहिती दिल्याचे आ. सरनाईक म्हणाले.