भल्या पहाटे भाईंदर पालिकेची कारवाई; टपऱ्या, बाकडे जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:11 AM2019-06-05T00:11:56+5:302019-06-05T00:12:07+5:30
महिला, मुलींना छेडण्याचे प्रकार तर नेहमीचेच आहेत. येथील महिलांनी तसेच रहिवाशांनी या विरोधात महापालिका, पोलिसांपासून स्थानिक नगरसेवक , आमदार यांच्याकडे सातत्याने तक्रारी केल्या आहेत.
मीरा रोड : मीरा रोडच्या साईबाबा नगर व परिसरात वाढलेले हातगाडी , टपºया, छप्पर, बाकडे तसेच भटक्यांनी मांडलेल्या बस्ताना विरोधात रहिवाशांनी संताप व्यक्त करत लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली होती. याची दखल घेत मंंगळवारी सकाळी साडेपाचपासूनच महापालिका आणि पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह आमदार नरेंद्र मेहतांच्या मागणीवरून कारवाई केली. भल्या सकाळी झालेल्या या कारवाईने नागरिकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
मीरा रोडच्या साईबाबानगरचे दोन प्रभागात विभाजन करण्यात आले. त्यामुळे प्रभाग १७ मधून भाजपाच्या दिपीका अरोरा, हेमा बेलानी, आनंद मांजरेकर व प्रशांत दळवी असे चार नगरसेवक आहेत. तर प्रभाग १९ मध्ये काँग्रेसचे अनिल सावंत, मर्लिन डिसा, राजीव मेहरा व रुबिना शेख हे चार नगरसेवक आहेत. साईबाबानगरचा विचार केला तर एकूण आठ नगरसेवक या भागातील असतानाही परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण, हातगाड्या, टपºया, गॅरेज, शेड मोठ्या संख्येने वाढल्याने रहिवाशी त्रासले आहेत. त्यातच गर्दुल्ल्यांचा अड्डा या भागात झाला आहे.
महिला, मुलींना छेडण्याचे प्रकार तर नेहमीचेच आहेत. येथील महिलांनी तसेच रहिवाशांनी या विरोधात महापालिका, पोलिसांपासून स्थानिक नगरसेवक , आमदार यांच्याकडे सातत्याने तक्रारी केल्या आहेत. परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून ठोस कारवाईच केली जात नाही. बहुतांश नगरसेवक तर प्रभागात फिरकतही नाहीत असा संताप रहिवाशांनी बोलून दाखवला.
साईबाबानगरमधील समस्यांबाबत भाजप व काँग्रेसचे नगरसेवक ठोस काही करत नसतानाच आमदार मेहता यांच्याकडे तक्रारी करूनही काही होत नव्हते. लोकसभा निवडणुकी आधी झालेल्या रहिवाशांच्या बैठकीतही मेहता यांना बोलावून समस्यांचा पाढाच वाचला होता. त्यावेळी मेहतांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. पण कार्यवाही काहीच होत नसल्याने रहिवाशांनी रविवारी सभा घेऊन पुन्हा मेहतांना बोलावले होते. त्या बैठकीतही रहिवाशांनी लोकप्रतिनिधींवर समस्यांकडे डोळेझाक करत असल्याबद्दल टीकेची झोड उठवली होती.
रहिवाशांच्या संतापानंतर मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास आ. मेहता यांच्यासह उपअधीक्षक शांताराम वळवी, अतिक्रमण विभागप्रमुख दादासाहेब खेत्रे, प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे, नरेंद्र चव्हाण आदींसह पोलीस, बाऊन्सर व कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने कारवाईला सुरूवात केली.
श्रीकांत जिचकर चौक परिसरातील पदपथावर मोठ्या संख्येने बस्तान मांडलेल्या भटक्या लोकांना हटवण्यात आले. त्या नंतर साईबाबानगरमधील छप्पर - शेड, हातगाड्या, बाकडे, टपºया, गॅरेज आदी जेसीबीने तोडण्यात आले. पडीक वाहने उचलण्यात आली. पालिकेच्या कारवाईने नागरिकही आश्चर्यचकित झाले. त्यांच्यासाठी हा सुखद धक्का होता.
गेल्या पाच वर्षात साईबाबानगरची स्थिती आणखी बिकट झाली आहे. आठ नगरसेवक असूनही रहिवाशांच्या तक्रारींकडे कुणीही लक्ष देत नाही. यामुळे रहिवाशी संतापले होते. अखेर कारवाई झाल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. पण कारवाई सतत झाली पाहिजे. अन्यथा रहिवाशांना आंदोलन करावे लागेल. - सुधा गोसावी, रहिवाशी