भाईंदर-वसई रो-रो सेवा जून महिन्यात सुरू होणार; जुना रेल्वे पूल ठरला अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 09:05 PM2022-03-13T21:05:27+5:302022-03-13T21:10:55+5:30
जलमार्गाद्वारे वसई, भाईंदर, ठाणे, भिवंडी, कल्याण - डोंबिवली शहरांना जोडण्यासाठी ठिकठिकाणी जेट्टी उभारणीचे काम सुरू आहे.
मीरारोड - भाईंदर येथील जेट्टीचे काम झालेले असून नायगाव-वसई येथील जेट्टीचे काम ६० टक्के झालेले आहे. येत्या जून महिन्यापर्यंत काम पूर्ण होऊन भाईंदर-वसई अशी रो रो बोट सेवा सुरू होईल अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी रविवारी पाहणी दौऱ्यादरम्यान दिली. तर खाडीवरील जुना रेल्वे पूल खाली असल्याने जलवाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे .
जलमार्गाद्वारे वसई, भाईंदर, ठाणे, भिवंडी, कल्याण - डोंबिवली शहरांना जोडण्यासाठी ठिकठिकाणी जेट्टी उभारणीचे काम सुरू आहे. रविवारी भाईंदरच्या जेसलपार्क जेट्टी येथून बोटीने भाईंदर-नायगाव असा प्रवास करत नायगाव येथील जेट्टीची पाहणी केली. खासदार राजन विचारे व राजेंद्र गावित, आमदार गीता जैन, मेरीटाईम बोर्डाचे संजय शर्मा, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, पश्चिम रेल्वेचे अधिकारी प्रियेश अग्रवाल, मच्छीमार नेते बर्नड डिमेलो, नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेवक संदीप पाटील, लक्ष्मण जंगम, जॉर्जी गोविंद आदी उपस्थित होते.
भाईंदर पश्चिम येथील जेट्टीचे काम पूर्ण झाले असून नायगाव येथील जेट्टीचे काम ६० टक्के झाले आहे. येत्या ३१ मे पर्यंत जेट्टीचे काम पूर्ण होऊन जून महिन्यापासून रो रो बोट सेवा सुरू होईल. ह्या मार्गावर जलवाहतुकीची सेवा उपलब्ध होऊन वसई-विरार व मीरा-भाईंदरच्या नागरिकांना रो रो मार्गे त्यांचे वाहने नेता येतील. जेणे करून महामार्ग द्वारे लांबचा वळसा घालून जाणारा वेळ व इंधन खर्च वाचेल. रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल अशी माहिती विचारे यांनी दिली. विरंगुळा व पर्यटनाचा आनंद नागरिकांना घेता येईल व रोजगाराची संधी निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.
भाईंदर नायगाव दरम्यानच्या जुन्या पुलावर पाणजू गावासाठीची जलवाहिनी असून सदरचा पूल हा खाली असल्याने जलवाहतूकला अडथळा ठरत आहे. पाणजू गावची जलवाहिनी नवीन रेल्वे पुलावर स्थलांतरित करण्यासाठी रेल्वेकडून बारा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. सदर रक्कम माफ करण्यासाठी रेल्वे मंत्री यांना भेटणार आहोत. त्यानंतर धोकादायक झालेला पूल निष्कासित करून भविष्यात मोठ्या जलवाहतुकीसाठी मार्ग मोकळा होणार असल्याचे गावित व विचारे म्हणाले.