भाईंदरमध्ये चोर समजून तरुणाची मारझोड करून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:37 AM2021-03-07T04:37:43+5:302021-03-07T04:37:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : चोर समजून एका तरुणास बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना भाईंदर पूर्वेच्या इंदिरानगर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड : चोर समजून एका तरुणास बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना भाईंदर पूर्वेच्या इंदिरानगर भागात शनिवारी पहाटे घडली. नवघर पोलिसांनी याप्रकरणी चौघा तरुणांना अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी अशाप्रकारे कोणाला मारहाण करू नका, पोलिसांना कळवा, असे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवघरच्या शंकर नारायण महाविद्यालयाच्या समोरील महापालिका मैदानात एक तरुण पडलेला असल्याची माहिती पहाटेच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाची ओळख पटवली असता त्याचे नाव सुरजभान सोनी (वय २४, रा. गोरेगाव) हे असल्याचे व तो मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याचे निष्पन्न झाले. अगोदर भाईंदरला राहणारा सोनी गेले काही दिवस गोरेगावला नातलगांकडे राहत होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अधिकृतपणे अटक केलेल्या आरोपींची नावे जाहीर केली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरजित गुप्ता, मिथिलेश यादव ऊर्फ गव्वा, चिराग सिंग व शिवकुमार ऊर्फ लाला अशी आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद पाटील व पथकाने तपास करत काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यातील चार तरुणांनी चोर समजून सोनीची लाकडी पट्ट्या व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याचे आढळून आल्याने त्यांना अटक केली. आरोपी हे इंदिरानगरमध्येच राहणारे असून सर्व १९ ते २२ वयोगटातील आहेत .
पहाटे ३ ते ३.३० च्या सुमारास सदर आरोपींना सोनी हा स्मशानभूमीच्या मागील भागात बसलेला दिसला. त्याला चोर समजून आरोपींनी बळजबरी पकडून मैदानात आणले व तेथे त्याची बेदम मारझोड करीत हत्या केली. आरोपींना त्याच भागात राहणारा एक मोबाईलचोर तेथे दिसल्याने सोनी हा त्याचा साथीदार असल्याचे समजून चौघांनी त्याला मारहाण केली. पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ पुढील तपास करत आहेत.
...........
पोलिसांचा आरोपींनी वाचवण्याचा प्रयत्न?
पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याची माहिती दिली. मात्र अटक केलेल्या चार आरोपींची नावे जाहीर करण्यास नकार दिला. बलात्काराच्या प्रकरणात आरोपी हा पीडितेचा नातलग असेल तर किंवा आरोपी हे अल्पवयीन असल्यास त्यांची नावे जाहीर न करण्याचे बंधन पोलिसांवर आहे. प्रस्तुत प्रकरणात आरोपी हे १९ वर्षावरील असतानाही पोलिसांनी त्यांची नावे दडवून ठेवण्याचा आटापीटा केल्याने पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
........
वाचली