पेट्रोलकांडातील बहादूरसिंगला अटक
By admin | Published: January 4, 2016 01:58 AM2016-01-04T01:58:56+5:302016-01-04T01:58:56+5:30
बारबाला पत्नी तानिया सह तिची भाची शुकीला शेख ह्यांना पेट्रोल ओतून जाळणारा फरार बहाद्दूरसिंग परमार याला अखेर मीरारोड पोलिसांनी राजस्थानच्या माउंट आबू रोड येथून अटक केली
मीरा रोड : बारबाला पत्नी तानिया सह तिची भाची शुकीला शेख ह्यांना पेट्रोल ओतून जाळणारा फरार बहाद्दूरसिंग परमार याला अखेर मीरारोड पोलिसांनी राजस्थानच्या माउंट आबू रोड येथून अटक केली . तानियाने फ्लॅटसाठी लावलेला तगादा व तिचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय यातून बहाद्दूरने तिला जाळून मारल्याचे सकृतदर्शनी समोर आले आहे .
गुरु वारी ( दि . ३१ डिसेंबर ) पहाटे मीरा रोड हबटाऊन गार्डेनीया मधील ५०१ क्र . च्या सदनिकेत बहाद्दूरने पत्नी तानिया, १३ महिन्यांचा मुलगा जयदेव व तानियाची भाची शुकीला यांना पेट्रोल ओतून जाळले होते . त्यात तानिया व शुकीलाचा मृत्यू झाला. जयदेव सुदैवाने बचावला .
या पेट्रोलकांडामुळे सर्वच हादरले . उपअधीक्षक सुहास बावचे व वरिष्ठ निरीक्षक जगदीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सत्यवान कदम , महेश कुचेकर आदींची पथके फरार बहाद्दूरच्या शोधासाठी रवाना झाली . शनिवारी रात्री बहाद्दूरला माउंट आबू रोडवरून उपनिरीक्षक कुचेकर व पोलिस नाईक ब्राह्मणे यांच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले . पेट्रोलकांडात बहाद्दूरचे हात व चेहरा भाजला आहे . रखवालदार व रहिवाशांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने जयदेव बचावला. शुकीयाचे जागीच निधन झाले तर तानियाचा इस्पितळात मृत्यू झाला. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज व भाडेकरू म्हणून पोलीस पडताळणी केलेली असल्याने आरोपी बहादूर असल्याची ओळख पटली . सोसायटीचे अध्यक्ष विवेक मने यांनी बहाद्दूरच्या खारदांडा येथील अंबिका ज्वेलर्सचे कार्ड घेऊन ठेवल्याने पोलिसांना बहाद्दूर चे खारदांडा येथील घरापर्यंत पोहचणे सोपे झाले .
बहाद्दूरची ओळख व पत्ता सापडल्याने पोलिसांनी त्याचे खारदांडा येथील घर गाठले . काही दिवसांपासून तो घरी आला नसल्याचे समजले . शाळेला सुट्टी असल्याने त्याची पत्नी मुलांना घेऊन नालासोपारा येथे माहेरी गेली होती . पोलिसांनी त्याच्या पत्नीला गाठून चौकशी केली . राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील चारभूजाजवळ पिपलांत्री हे गाव असल्याचे व त्याची अल्टो गाडी सोबत असल्याचे पोलिसांना समजले .
गाडीचा नंबर मिळताच महामार्गावरील टोल नाक्यांवरून माहिती घेत घेत पोलीस पथक थेट चारभूजा शहरापर्यंत पोहचले. तेथील टोलनाक्यावरून बहाद्दूरची अल्टो पार झाली नव्हती . तोच बहादूर फालना येथील लांबच्या नातलगांकडे आश्रय घेण्याच्या प्रयत्नात होता . परंतु पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे त्याच्या नातलग, मित्रांना समजले होते . त्याच्या मागावर असलेल्या कुचेकर यांच्या पथकाने त्याला माउंट आबू रोड वरच तो एका ठिकाणी थांबलेला असतानाच धरले .