पत्रीपुलासाठी ‘भीख मांगो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:01 AM2019-06-10T00:01:15+5:302019-06-10T00:02:27+5:30
पैसे सरकारला पाठवणार : आंदोलनास वाहनचालकांनी दिला पाठिंबा
कल्याण : पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या निषेधार्थ रविवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरत ‘भीख मांगो’ आंदोलन छेडले. जुना धोकादायक अवस्थेतील पत्रीपूल तोडून सात महिन्यांचा कालावधी उलटला, तरीही कामाने गती घेतलेली नाही. नागरिकांच्या आंदोलनाला वाहनचालकांनीही पाठिंबा दर्शवला.
धोकादायक अवस्थेतील ब्रिटिशकालीन रेल्वे पत्रीपूल नोव्हेंबरमध्ये पाडण्यात आला. या कामासाठी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० असा सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सद्य:स्थितीत बाजूकडील केडीएमसीच्या पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू असली, तरी हा पूल अरुंद असल्याने तासन्तास वाहतूककोंडीचा सामना येथून मार्गस्थ होणाºया वाहनचालकांना करावा लागत आहे. जुन्या पुलाचे पाडकाम झाल्यानंतर महिनाभराने म्हणजेच ३० डिसेंबरला या नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते. हे काम वर्षभरात पूर्ण करू, असे आश्वासन एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, अत्यंत निकड असलेले प्रकल्प मुदतीपूर्वीच पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा हातखंडा असल्याने पत्रीपुलाचे काम मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केले होते. नवीन पत्रीपूल बांधण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने कोंडीच्या रोजच्या त्रासाने बेजार झालेल्या काही तरुणांनी मे महिन्यातही रस्त्यावर उतरत पत्रीपुलाचे काम कधी पूर्ण होणार? या आशयाचे बोर्ड घेत शांततेच्या मार्गाने संबंधित यंत्रणेला सवाल केला होता. रविवारी स्थानिक नागरिकांनी पत्रीपूल परिसरात ‘भीख मांगो’ आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जमा झालेले पैसे सरकारला पाठवणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते शकील खान यांनी दिली. कोंडीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांनी आंदोलनाला पाठिंबा देत, लोकप्रतिनिधी आणि सरकारविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
पाच महिन्यांत पाच टक्केही काम नाही
च्पाच महिने उलटूनही पत्रीपुलाचे पाच टक्केही काम होऊ शकलेले नाही. पर्यायी पुलावर उद्भवणारी कोंडी कल्याणकरांसाठी डोकेदुखी बनली आहे.
च् नव्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी होत असताना संबंधित यंत्रणेचे याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. अर्धा ते पाऊण तास वाहने कोंडीत अडकून पडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.