भाईंदरचे भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय चालवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत ठाणे पॅटर्न
By धीरज परब | Published: January 25, 2023 09:40 PM2023-01-25T21:40:41+5:302023-01-25T21:41:08+5:30
ठाणे महापालिकेच्या धर्तीवर रुग्णालय खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याची मागणी केली असता तसा प्रस्ताव आल्यावर मंजुरी देऊ, असे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी दिली आहे.
मीरारोड - भाईंदर येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात जनतेला आवश्यक उपचार मिळत नाहीत डॉक्टर - कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाहीत. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या धर्तीवर रुग्णालय खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याची मागणी केली असता तसा प्रस्ताव आल्यावर मंजुरी देऊ, असे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मीरा भाईंदर महापालिकेने भाईंदरचे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय बांधले. चार मजली रुग्णालय २०० खाटांचे असून पालिकेने त्यामधील फर्निचर, उपकरणे आदींवर खर्च केला. परंतु ऑपरेषांत थिएटर आयसीयू, एनआयसीयु, अपघात विभाग आदी अत्यावश्यक बाबी नसल्याने केवळ ओपीडी आणि किरकोळ उपचार, प्रसूतीगृह चालवले जाते. रुग्णालयाचा खर्च पालिका प्रशासन व राजकारणी यांना नकोसा असल्याने ते राज्य शासना कडे सोपवण्यात आले.
मात्र शासना कडे जाऊन सुद्धा आजही गंभीर आजारांवर उपचार - शस्त्रक्रिया होत नाहीत तसेच रुग्णालय म्हणून आवश्यक उपचार - सुविधा मिळत नाहीत. इतकेच काय तर डॉक्टर - कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा रखडतात. त्यामुळे शहरातील नागरिकांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयाचा खर्चिक मार्ग पत्करावा लागतो. शासकीय रुग्णालयात अत्यावश्यक व अत्याधुनिक सेवा मिळावी म्हणून आमदार गीता जैन या प्रयत्नशील आहेत. त्यांनी शासना कडे सतत पत्रव्यवहार केला आहे. परंतु शासना कडून निधी व सुविधा मिळत नसल्याने रुग्णालय असून देखील लोकांच्या उपयोगी पडत नाही म्हणून आ. जैन यांच्या मागणी वरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंगळवार २४ जानेवारी रोजी मंत्रालयात बैठक घेतली होती.
शहरातील सर्व सामान्य जनतेला मोफत उपचार मिळावे यासाठी आ. जैन यांनी भीमसेन जोशी रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवणे आवश्यक असून त्यासाठी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर सदर रुग्णालय खाजगी संस्थेस चालवण्यास देण्याची मागणी केली. या कार्यपद्धती मध्ये पिवळे व केशरी रंगाचे शिधावाटप कार्ड असणाऱ्यांना ओपीडी पासून शस्त्रक्रिया, रुग्णालयातील खाट पासून जेवण आदी सर्व मोफत मिळणार आहे. तर पांढऱ्या रंगाची शिधापत्रिका असणाऱ्यांना शासनाच्या जे. जे आदी रुग्णालयातील दरा नुसार उपचार मिळणार आहेत. त्याच सोबत बाळंतपण वा शस्त्रक्रिये द्वारे बाळंतपण सुद्धा मोफत असावे असा प्रस्ताव आ. जैन यांनी बैठकीत ठेवला.
यामुळे शासनाचा मोठा खर्च वाचेल शिवाय नागरिकांना चांगली व मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे असे आ. जैन म्हणाल्या. यावेळी अश्या पद्धतीने रुग्णालय दिल्यास शहरातील नागरिकांना मोफत तसेच योग्य उपचार कसे मिळेतील याबाबतची एक चित्रफीत सुद्धा सादर करण्यात आली. सदर प्रस्तावा बाबत मंत्री सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रीतसर प्रस्ताव आणण्यास सांगितले. प्रस्ताव चांगला असून तो राज्यभर लागू करता येऊ शकतो या बाबत सुद्धा विचार विनिमय करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे आ. जैन म्हणाल्या.