टँकरच्या लॉबीकडून भार्इंदरला बेसुमार उपसा
By admin | Published: March 17, 2016 02:50 AM2016-03-17T02:50:22+5:302016-03-17T02:50:22+5:30
पाणीटंचाईची झळ दिवसेंदिवस वाढत असताना मीरा-भार्इंदरमधील टँकर लॉबीने पालिका व सरकारी यंत्रणेच्या नाकावर टिच्चून पाण्याचा बेसुमार उपसा व काळाबाजार सुरू केला आहे.
मीरा रोड : पाणीटंचाईची झळ दिवसेंदिवस वाढत असताना मीरा-भार्इंदरमधील टँकर लॉबीने पालिका व सरकारी यंत्रणेच्या नाकावर टिच्चून पाण्याचा बेसुमार उपसा व काळाबाजार सुरू केला आहे. महिनाभरात टँकरचा दर तिप्पट झाला आहे. ५०० लीटरसाठी दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत.
मीरा-भार्इंदरमध्ये पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरू लागले आहेत. आधीच ४८ तासांनी येणारे पाणी आता दोन दिवसांच्या कपातीमुळे १०० तासांवर गेले आहे. याचा पुरेपूर फायदा टँकर लॉबीने घेण्यास सुरुवात केली आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील उत्तन, गोराई, डोंगरी, तारोडी तर महामार्गाजवळच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील काजूपाडा, चेणे, वरसावे, माशाचापाडा, महाजनवाडी या परिसरातून मोठ्या प्रमाणात बोअरवेल, विहीर, तलावातून रोज मोठ्या संख्येने टँकर भरले जात आहेत.
याशिवाय, शहरी भागातील गोडदेव, भार्इंदरमधील विहिरी, तलाव पाणीउपशाची केंद्रे आहेत. मोठ्या टँकरसह रिक्षा टेम्पोत छोट्या टाक्या बसवून पाणीविक्री करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मोठ्या टँकरसाठी गेल्या महिन्यात ८०० ते ९०० रुपये मोजावे लागत होते. त्यालाच आता तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहे. पालिकेच्या पाण्याची विक्री तर अनेक घरांमध्ये सुरू आहे. (प्रतिनिधी)
पालिका टँकर लॉबीमागे
राजकारण्यांसह या टँकर लॉबीला पाठीशी घालण्याचे काम महापालिकाही करत आहे. पाणीउपशाकडे महसूल व पालिका विभागाचे दुर्लक्ष होत आहे. छोट्या रिक्षा टेम्पोत तर ५०० लीटरसाठी दीड ते दोन हजार रुपये वसूल केले जात आहेत. गेल्या महिन्यात ४०० ते ७०० रुपयांना हा छोटा टँकर मिळत होता. छोट्या टेम्पोतून बोअरवेल, विहिरीचे पाणी मिळत असून त्याचे दरही ५०० रुपयांवर गेले आहे.