भार्इंदरची परिवहनसेवा खिळखिळी, ५८ पैकी केवळ ३२ बसच रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:14 AM2018-06-12T04:14:55+5:302018-06-12T04:14:55+5:30
अत्यावश्यक सेवा असूनही मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहनसेवेची सत्ताधारी व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुरवस्था झाली आहे. सध्या ५८ पैकी अवघ्या ३२ बसच रस्त्यावर धावत असून तब्ब्ल २६ बस टायर नाही, इंजीनमध्ये बिघाड, देखभाल नाही आदी विविध कारणांनी बंद पडलेल्या आहेत.
- धीरज परब
मीरा रोड : अत्यावश्यक सेवा असूनही मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहनसेवेची सत्ताधारी व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुरवस्था झाली आहे. सध्या ५८ पैकी अवघ्या ३२ बसच रस्त्यावर धावत असून तब्ब्ल २६ बस टायर नाही, इंजीनमध्ये बिघाड, देखभाल नाही आदी विविध कारणांनी बंद पडलेल्या आहेत. टायर, दुरुस्तीच्या कामांचे पैसे देण्यास वा आधीची थकबाकी असल्याने ही नामुश्की ओढवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याचा परिणाम परिवहनसेवेवर होऊन प्रवासी त्रासले आहेत. गंभीर बाब म्हणजे पावसाळा सुरू झाला असताना बसचे वायपर बंद आहेत.
आघाडी सरकारच्या काळात मीरा-भार्इंदर महापालिकेस ५० बस अनुदानावर मिळाल्या होत्या. त्या काही वर्षांतच भंगारात निघाल्या. नंतर, पुन्हा काँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत महापालिकेस तब्ब्ल १०० बस मोफत मिळाल्या. अनेक बसेसचा खुळखुळा झाला आहे. टायर नाही, कधी इंधनासाठी पैसे नाहीत, अशा कारणांनी परिवहनसेवा ठप्प होत आहे.
सध्या ५८ बस आहेत. त्यात व्हॉल्वो एसी बसचाही समावेश आहे. सध्या ३२ बसच रस्त्यावर धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच आता शाळा, महाविद्यालये सुरू होणार असल्याने प्रवासी, विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. बस नसल्यास प्रवाशांना नाइलाजाने रिक्षाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
सध्या प्लेझंट पार्कयेथील आगारात नादुरु स्त बस उभ्या आहेत. खराब झालेले टायर रांगेने लावलेले आहेत. टायर खरेदीअभावी सुमारे २२ बस बंद आहेत. याआधीही ढिसाळपणामुळे टायरखरेदी होत नव्हती. आताही टायरखरेदीसाठी पैसे दिले जात नसल्याने वितरकाने नवीन टायर देणे बंद केले आहे.
निधीच देत नाही
बसच्या देखभाल दुरु स्तीसाठी पालिकेने सत्यम मोटार्स, ओम मोटार्स, कमल मोटार्स या तिघांना विभागून कामे दिली आहेत. परंतु, कामाचा मोबदला व लागणाऱ्या सुट्या भागांचे पैसेच पालिका रखडवत असल्याने त्याचा विपरित परिणाम देखभालीवर झालेला आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभाराचा फटका मीरा-भाईंदरमधील सामान्य प्रवाशांना विनाकारण सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
परिवहन ही अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे आवश्यकता पडल्यास प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जातो. टायर, देखभाल दुरु स्ती वा अन्य आवश्यक बाबींसाठी आपल्याकडे देयक देण्याची प्रकरणे आली, तर ती लगेच मंजूर केली जातात. पालिकेकडे त्यासाठी निधी आहे.
- शरद बेलवटे, मुख्य लेखाधिकारी
सध्या ३६ बस या प्रवाशांच्या सेवेत सुरू आहेत. बाकीच्या बस देखभाल-दुरु स्तीसाठी बंद आहेत. येत्या दोन ते चार दिवसांत प्रलंबित देयकांचा प्रश्न व दुरु स्ती आदी कामे मार्गी लागतील.
- स्वाती देशपांडे, उपव्यवस्थापक, परिवहन
आमच्या प्रभागात बससेवेची समस्या नाही. मीरा रोड ते ग्रीन व्हिलेज-वेस्टर्न पार्कअशी पालिकेची बससेवा नियमित सुरू आहे.
- सचिन म्हात्रे, नगरसेवक
मुर्धा ते उत्तन व पाली- चौक भागातील प्रवासी हे पालिकेच्या बससेवेवर अवलंबून असतात. पालिकेला मोठा फायदाही होतो. तरीही या भागातील नागरिकांना चांगली सेवा मिळत नाही. बसच्या फेºया कमी असून वेळेवर बस येत नाहीत. सेवा ठप्प झाली आहे. परिवहनसेवेचा बोजवारा उडाला आहे.
- शर्मिला बगाजी, नगरसेविका