भार्इंदरचे कर्मचारी भिवंडी पालिकेमध्ये
By admin | Published: May 11, 2017 01:54 AM2017-05-11T01:54:15+5:302017-05-11T01:54:15+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी निम्मे कर्मचारी व अधिकारी भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी गेले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी निम्मे कर्मचारी व अधिकारी भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी गेले आहेत. यामुळे दैनंदिन कारभारावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.
भिवंडीत ७५१ कर्मचारी व अधिकारी निवडणुकीसाठी रवाना झाले आहेत. यात सर्वाधिक ४५० सफाई कामगार व शिपायांचा भरणा असून उर्वरित लिपिक, अभियंता व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात प्रशासनाने सुरू केलेल्या नवीन नळजोडणी मोहिमेला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही मोहीम आॅनलाइन असली, तरी त्याची छाननी व ग्राहकांचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच, भुयारी वाहतूक मार्गाचे लोकार्पण काही दिवसांवर येऊन ठेपले असताना पूर्णत्वास आलेल्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी अभियंत्यांची वानवा निर्माण झाली आहे.
अपुऱ्या मनुष्यबळात पालिकेचा कारभार थंडावला असून अतिरिक्त ठरणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांना मीरा-भार्इंदर महापालिकेत परत पाठवा, अशी मागणी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी केली आहे. त्यातच, आॅगस्टमध्ये पालिका निवडणुकीची शक्यता असून त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.