भार्इंदर पालिका :स्वच्छतेत अव्वल येण्यासाठी प्रशासन सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:34 AM2017-12-18T01:34:04+5:302017-12-18T01:34:14+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी स्वच्छता अभियान मोहीम सुरू केली आहे. त्यात आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी शुक्रवारी नगरसेवकांसाठी पालिका मुख्यालयात कार्यशाळा घेतली.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी स्वच्छता अभियान मोहीम सुरू केली आहे. त्यात आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी शुक्रवारी नगरसेवकांसाठी पालिका मुख्यालयात कार्यशाळा घेतली.
यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात वरचा क्रमांक मिळवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी स्वच्छतेचे मोबाइल अॅपदेखील सुरू केले असून त्यावर नागरिकांनी स्वच्छतेप्रति समाधान व्यक्त करायचे आहे. शाळा, महाविद्यालये, शिक्षक, व्यापारी व ज्येष्ठ नागरिक संघटना, गृहनिर्माण संस्था आदी ठिकाणी कार्यशाळा घेत नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती केली जात आहे. यासाठी नगरसेवकांची १७ नोव्हेंबरला नगरभवन सभागृहात कार्यशाळा ठेवली होती. त्या वेळी एकूण ९५ पैकी केवळ दोनच नगरसेवकांनी हजेरी लावल्याने नगरसेवकांची स्वच्छतेप्रति असलेली भावना चव्हाट्यावर आली होती.
आयुक्तांनी पुढाकार घेत शुक्रवारी पालिका मुख्यालयात नगरसेवकांसाठी कार्यशाळा घेतली. मात्र, त्यालाही सुरुवातीला नगरसेवकांनी बेताची उपस्थिती लावली. मात्र, अधिकाºयांनी सतत संपर्क साधल्यानंतर काही नगरसेवक आले. यानंतरही ९५ पैकी सुमारे ४० नगरसेवकांनी कार्यशाळेला हजेरी लावली. या कार्यशाळेत उपस्थित नगरसेवकांना स्क्रीनद्वारे स्वच्छतेची माहिती देण्यात आली. या वेळी प्रशासनाने नगरसेवकांना स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छतेच्या विविध प्रकारांना देण्यात येणाºया गुणांकनाविषयीच्या माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.
२५ लाखांच्या निधीचे आश्वासन
जे नगरसेवक त्यांच्या प्रभागातील १०० टक्के स्वच्छतेचे काम करतील, त्या प्रभागाच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी दिला जाईल, अशी घोषणाही करण्यात आली. मात्र, प्रभागात कायम असलेली अस्वच्छता अनेकदा तक्रार करूनही स्वच्छ केली जात नसल्याचा सूर अनेक नगरसेवकांनी आळवला. या वेळी महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी सभापती ध्रुवकिशोर पाटील, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, नगरसचिव वासुदेव शिरवळकर आदी उपस्थित होते.