भिवंडीत भीषण अग्नितांडव; दापोडा भागातील गोदामे भस्मसात; इलेक्ट्रॉनिक वस्तू, वॉटर प्युरिफायर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 04:50 AM2018-02-04T04:50:06+5:302018-02-04T04:50:15+5:30
भिवंडीतील गोदामांना शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याने बड्या नामांकित कंपन्यांची किमान १२ मोठी गोदामे जळून भस्मसात झाली. या घटनेत जीवितहानी झाली किंवा कसे, ते अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी कोट्यवधी रुपयांच्या इलेक्ट्रीक वस्तू, वॉटर प्युरिफायर यांची हानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ठाणे/भिवंडी : भिवंडीतील गोदामांना शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याने बड्या नामांकित कंपन्यांची किमान १२ मोठी गोदामे जळून भस्मसात झाली. या घटनेत जीवितहानी झाली किंवा कसे, ते अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी कोट्यवधी रुपयांच्या इलेक्ट्रीक वस्तू, वॉटर प्युरिफायर यांची हानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग विझवण्याकरिता मुंबईहून अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आले. ही आग पूर्णपणे विझवण्याकरिता आणखी काही तास लागतील, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाºयांनी दिली.
भिवंडी, दापोडा भागातील १६१ कॉर्पोरेशन, इंडियन गेट कंपनी माणकोली, व्हीआरएल लॉजिस्टीक यांच्या गोदामाला दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. आजूबाजूची किमान १२ गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली. आग विझवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या, कल्याण महापालिकेच्या गाड्या अपुºया पडल्याने मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून कुमक मागवावी लागली. रात्री ८ वाजता आग नियंत्रणात आली असली, तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. आग पूर्णपणे विझवण्यासाठी आणखी किमान १० ते १२ तासांचा अवधी लागण्याची शक्यता अग्निशमन विभागाने व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी भिवंडीत गोदामाला आग लागली होती. शनिवारी दुपारी पुन्हा माणकोली भागातील व्हीआरएल लॉजिस्टीक या गोदामाला आग लागली. तिने आजूबाजूच्या गोदामांना ज्वाळांमध्ये लपेटले. सुरुवातीला अॅपेक्स या मिनरल वॉटर प्युरिफायर कंपनीच्या गोदामास आग लागली. त्या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून साठवलेल्या प्लास्टिकच्या दाण्यांच्या साठ्यांनी लागलीच पेट घेतला. भडकलेली आग नजीकच्या व्होल्टास कंपनीच्या गोदामात पसरली. तेथे साठवलेले फ्रीज, एसी, पंखे तसेच इतर इलेक्ट्रीक वस्तूंची सात गोदामे जळून खाक झाली. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, सुमारे ५० ते १०० मीटर धुराचे लोट आकाशात पसरले होते. आगीत व्होल्टास कंपनीची सात गोदामे, अॅपेक्स मिनरल वॉटर कंपनीची तीन गोदामे व इतर केमिकल कंपन्यांची दोन गोदामे यांची मोठी हानी झाली.
आगीच्या घटनेमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी झाली. काही हौशी वाहनचालकांनी आगीच्या धुरांचे लोट मोबाइलमध्ये चित्रित करण्याकरिता आपली वाहने रस्त्यात थांबवून चित्रीकरण सुरू केले होते.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
अग्नितांडव सुरू होताच या परिसरातील कामगारांनी मिळेल त्या वाटेने पळ काढला. त्यामुळे जीवितहानी झाली नसावी, असा अंदाज आहे. मात्र, त्याची नेमकी माहिती अजून उपलब्ध झालेली नाही.
आजूबाजूच्या गोदामांमधील कामगारांनी व बघ्यांनी केलेली गर्दी हटवताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्याकरिता चौकशी करण्यात येणार असल्याचे अग्निशमन अधिकारी व पोलिसांनी सांगितले.
फेब्रुवारी-मार्चदरम्यान भिवंडीतील गोदाम भागात आगीचे प्रमाण वाढत असल्याने याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली. आग विझवण्यासाठी या परिसरातील पाणीटंचाईमुळे पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले.
कल्याणमध्ये बसला आग
कल्याण : खाजगी बसचे इंजीन गरम झाल्याने त्याने पेट घेतल्याची घटना शनिवारी दुपारी सहजानंद चौकात घडली. या बसमधील प्रवासी वेळीच खाली उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचालकाने प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवले.