भिवंडीत अकिरा मियावकी संकल्पनेतून साकारले पाहिले घनवन प्रकल्प
By नितीन पंडित | Published: January 9, 2024 07:00 PM2024-01-09T19:00:30+5:302024-01-09T19:00:42+5:30
मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.
भिवंडी : पर्यावरण रक्षणासाठी जंगल वाचविणे गरजेचे असताना शहरातील काँक्रिटच्या जंगलात झाडांचे जंगल निर्माण करण्यासाठी अकिरा मियावकी या जपानी संकल्पनेतून घनवन बनविण्यात येत असून भिवंडी शहरात केशवसृष्टी संस्थेच्या वतीने एचडीएफसी लाईफ इन्श्युरंस कंपनीच्या सीएसआर फंडातून बनविण्यात आलेल्या शहरातील पहिल्या अकिरा मियावकी घनवन प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील हिंदू स्मशान भूमी येथे मंगळवारी राबविण्यात आला.
मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी एच डी एफ सी लाईफचे मुख्य उपाध्यक्ष सुब्रोतो रॉय,पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे,विठ्ठल ठाके,उपायुक्त दीपक झिंजाड, केशवसृष्टी चे कोषाध्यक्ष नीलकंठ अय्यर,सदस्य शरद बन्सल,पालिका उद्यान विभाग अधीक्षक निलेश संखे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले,प्रभाग समिती क्रमांक पाच सहाय्यक आयुक्त राजेंद्र वरळीकर,समाजसेवक भूषण रोकडे यांसह मोठ्या संख्येने पालिका अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते.शहरात प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून हवेची गुणवत्ता ढासळली आहे.त्यामुळे शहरात छोट्या जागेत अधिकाधिक जंगल निर्माण करण्यासाठी अकिरा मियावकी ही जपानी संकल्पना उपयुक्त ठरणार असून त्यामध्यमातून शहर प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया यावेळी भिवंडी पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिली आहे.
पालिका क्षेत्रातील हिंदू स्मशान भूमीत ११००० चौरस फूट क्षेत्रफळात सुपारी,अशोका, पेरू,कामिनी,जास्वंद,कणेर,सोनचाफा,बहावा, कवट,पारिजात,बेल अशा विविध ५६ प्रजातींची ३५०० झाडे या ठिकाणी केशवसृष्टी संस्थेच्या माध्यमातून लावण्यात आली असून त्याचे संगोपन पुढील दोन वर्षे पालिका उद्यान विभागा कडून केले जाणार आहे.त्यानंतर येथे घनदाट जंगल होऊन त्यामुळे परिसरातील पर्यावरण समतोल वाढून प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे अशी माहिती आयुक्त अजय वैद्य यांनी दिली असून भविष्यात शहरातील अजून काही ठिकाणे निवडून तेथे असा प्रकल्प संस्थेच्या सहकार्यातून राबविण्यात येणार आहे असे शेवट वैद्य यांनी सांगितले.