Bhiwandi:आधारकार्डाचा दुरुपयोग करून दुचाकी घेऊन विक्री करणारी टोळी गजाआड
By नितीन पंडित | Published: July 13, 2024 07:44 PM2024-07-13T19:44:29+5:302024-07-13T19:44:46+5:30
Bhiwandi Crime News: शासकीय योजनेतुन घर मिळवुन देतो असे सांगून गरजु लोकांचे आधार कार्ड घेवुन त्यामध्ये फेरफार करून त्याचा वापर नविन गाडया खरेदी करून त्या गाड्या कमी किंमतीमध्ये विक्री करणाऱ्या टोळीला नारपोली पोलिसांनी अटक केली.
- नितीन पंडित
भिवंडी - शासकीय योजनेतुन घर मिळवुन देतो असे सांगून गरजु लोकांचे आधार कार्ड घेवुन त्यामध्ये फेरफार करून त्याचा वापर नविन गाडया खरेदी करून त्या गाड्या कमी किंमतीमध्ये विक्री करणाऱ्या टोळीला नारपोली पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चार जणांना नवीन दुचाकीसह अटक केली असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
नारपोली पोलीस ठाण्यात मागील आठवड्यात तक्रार आली होती.त्यानुसार मालेगाव येथे राहणारा तारीक अन्वर मुश्ताक अहमद मोमीन(रा.भिवंडी) याने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत गरीब व गरजु लोकांना घरे मिळणार आहेत,त्यामधील एक घर मिळवुन देईल असे सांगुन त्याने आणलेल्या फॉर्मवर तक्रारदार यांच्या सहया घेतल्या.तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड व रोख ४० हजार रूपये रक्कम घेवून घर मिळवुन न देता फसवणुक केली होती.त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला असता तारिक याचा भिवंडीतील जैतुनपूरा येथील साथीदार शैन उर्फ जुल्फीकार जमालुदफदीन मोमीन(३२) व कोनगाव येथे राहणारा मुन्तकीम मतीन शेख(२९) यांनी मिळून भिवंडी शहर आणि परिसरातुन अनेक लोकांना पंतप्रधान आवास योजनेतुन घरे मिळवून देण्याचे आश्वासन देवून त्यांची पॅन कार्ड व आधार कार्ड मिळविले व त्यांच्या विविध फॉर्मवर सह्या घेतल्या.त्याव्दारे विविध फायनान्स कंपनीचे लोन घेवून या लोनमधुन सुमारे २० दुचाकी वाहने मिळवून ती अर्ध्या किंमतीमध्ये भिवंडी, धुळे, मालेगाव व नंदुरबार परिसरात विक्री केल्या.
आरोपींनी जमा केलेल्या आधार कार्डवरील पत्ता बदलण्या करीता त्यांना शहरातील गैबीनगर येथील नाविद गुलाम अहमद खान(३२) याने मदत केली. या टोळीने शासनाचे घर घेण्यासाठी गरजू लोकांकडून घेतलेल्या आधारकार्डासह पैशाचा दुरुपयोग करून एकूण २० दुचाकी खरेदी केल्या. त्यापैकी आरोपींची विक्री केलेल्या विविध कंपण्याच्या १० लाख ४५ हजार रू किमतीच्या १० गाडया पोलिसांनी जप्त केल्या असुन त्यांनी मालेगाव येथे जावून आरोपीनी विक्री केलेल्या १० मोटार सायकल निष्पन्न केल्या आहेत.त्याबाबत जप्तीची कारवाई चालु आहे.या सर्व आरोपीना भिवंडी न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांची पोलीस कोठडी प्राप्त करून घेतली असून आरोपीकडे तपास करून त्यांनी तसेच धुळे, भिवंडी,मालेगाव व नंदुरबार परिसरात आणखी विकलेल्या वाहनांचा तपास चालु आहे.सदरची कामगिरी नारपोली पोलीस ठाणेचे मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक भरत कामत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद कुभांर, सपोनि विजय मोरे, पोउनि डि.डि.पाटील, सपोनि भरत नवले यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केली असल्याची माहिती कामत यांनी दिली आहे.