Bhiwandi: अभय योजनेतून मनपा तिजोरीत २५ कोटींची भर 

By नितीन पंडित | Published: January 1, 2024 06:06 PM2024-01-01T18:06:48+5:302024-01-01T18:07:07+5:30

Bhiwandi News: भिवंडी महापालिकेने थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी राबविलेल्या अभय योजनेतून पालिकेच्या तिजोरीत सुमारे २५ कोटी रुपये जमा झाले आहेत.

Bhiwandi: Addition of 25 crores to municipal treasury through Abhay Yojana | Bhiwandi: अभय योजनेतून मनपा तिजोरीत २५ कोटींची भर 

Bhiwandi: अभय योजनेतून मनपा तिजोरीत २५ कोटींची भर 

- नितीन पंडित
भिवंडी - भिवंडी महापालिकेने थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी राबविलेल्या अभय योजनेतून पालिकेच्या तिजोरीत सुमारे २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या या अभय योजना वसुली मोहिमेत वसुली पथकाने केलेल्या कामगिरी बाबत मनपा आयुक्तांनी समाधान व्यक्त केले असून अशाच प्रकारे कर वसुली करण्याचा सल्ला मनपा आयुक्त जय वैद्य यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

महापालिकेच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी डिसेंबर महिन्यात राबविलेल्या २३ दिवसांच्या मालमत्ता करावरील व्याजात सूट देणाऱ्या अभय योजना कालावधीत तब्बल १२ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात पालिका कर्मचाऱ्यांना यश मिळाले असून एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ४८ कोटी ६८ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला असून २०२२ या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ३६ कोटी ६८ लाख रुपये जमा झाले होते.मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची रक्कम ही १२ कोटी रुपयांनी अधिक आहे.

पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी मालमत्ता कर वसुली साठी १६ ते ३१ ऑक्टोंबर दरम्यान राबविलेल्या अभय योजना पहिल्या टप्प्यात १२ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी मालमत्ता कराची वसुली केली.त्यास मिळालेल्या यशा नंतर पालिका प्रशासनाने अभय योजना टप्पा दोन हा ९ ते ३१ डिसेंबर कालावधीत राबवला .या मध्ये १२कोटी ३५ लाख ६७ हजार रुपयांचा मालमत्ता कर गोळा केला आहे.अभय योजनेच्या दोन टप्प्यात मिळून २५कोटी २९ लाख ६७ हजार रुपयांचा महसूल पालिका तिजोरीत जमा झाला आहे.

झोपडपट्टी मालमत्ता धारकांकडून ४४ लाखाची विक्रमी वसुली,आयुक्तांनी केले अभिनंदन
पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने कर वसुली मोहीम जोरात सुरू असून सर्व अधिकारी कर्मचारी भूभाग लिपिक मालमत्ता कर वसुलीसाठी झटत आहेत.त्यामध्ये थकबाकी मालमत्ता धारकांना अभय योजनेचे महत्व पटवून देण्यात पालिका कर्मचारी यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे झोपडपट्टी विभागातील थकीत मालमत्ता कर वसूल करण्यात यश मिळाले आहे. प्रभाग समिती क्रमांक दोन मधील झोपडपट्टी विभागामार्फत टेमघर विभाग येथील थकीत झोपडपट्टी मालमत्ता धारक यांच्याकडून मालमत्ता कर वसूल करण्याकरिता सहायक आयुक्त सुधीर गुरव,कार्यालयीन अधीक्षक अनिल आव्हाड,कर निरीक्षक गणेश कामडी,झोपडपट्टी विभाग लिपिक राजेंद्र गायकवाड, शरद भवार,वसंत भोईर व वसुली पथक यांच्या अतोनात प्रयत्नाने  केलेल्या कारवाईअंती रुपये ४४ लाख  ३१ हजार १०० रुपये वसूल करण्यात यशस्वी झाले आहेत.यापूर्वी प्रभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त फैसल तातली, कार्यालयीन अधीक्षक मिलिंद पळसुले यांनी याचा पाठपुरावा करून प्रकरण लोक न्यायालयात नेले होते. पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी कर्मचाऱ्यांनी चांगली वसुली केल्या बद्दल सहाय्यक आयुक्त व सर्व कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Bhiwandi: Addition of 25 crores to municipal treasury through Abhay Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.