भिवंडी आगरी महोत्सवात साकारणार ओल्या दुष्काळाची प्रतिकृती: विशुभाऊ म्हात्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 02:17 AM2019-12-13T02:17:28+5:302019-12-13T02:17:48+5:30
२३ ते २६ जानेवारीदरम्यान महोत्सवाचे आयोजन
- नितीन पंडित
भिवंडी : भिवंडी येथे २३ ते २६ जानेवारी २0२0 या चार दिवसांच्या कालावधीत आगरी महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती भिवंडी आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष तथा सोनाळे ग्रामपंचायतीचे सरपंच विशुभाऊ म्हात्रे यांनी बुधवारी सोनाळे ग्राम पंचायतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवात राज्यात पडलेल्या ओला दुष्काळाची प्रतिकृती साकारण्यात येणार असल्याची माहितीदेखील म्हात्रे यांनी यावेळी दिली.
आगरी संस्कृती व तिचा मूळ वारसा जतन करण्याच्या उद्देशाने, तसेच भावी पिढीला आगरी संस्कृतीची माहिती व्हावी यासाठी या भिवंडी आगरी महोत्सवाचे दरवर्षी सोनाळे येथील क्रीडा मैदानात आयोजन करण्यात येते. यंदा महोत्सवाचे सातवे वर्ष आहे. आगरी संस्कृतीबरोबरच वारकरी संप्रदायाचे महात्म्यदेखील या महोत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी नागरिकांसमोर मांडण्यात येत असते.
दरम्यान, मोहत्सवात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसी कॅमेरे आणि संस्थेचे खासगी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक तसेच पोलिसांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी यावेळी दिली.
या महोत्सवाचे नाव आगरी मोहोत्सव असले तरी, हा महोत्सव सर्व जातीधर्मांच्या नागरिकांचा महोत्सव असल्याने सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष हनुमान पाटील, ज्ञानेश्वर ओम मुकादम, आहोक पालकर, अनिल गजरे, मनोहर तरे, संदीप पाटील, कैलास मढवी, आत्माराम वाकडे, अमर म्हात्रे, संतोष म्हात्रे यांच्यासह आगरी मोहोत्सव समितीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांचा सन्मान
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १0 मान्यवरांचा सन्मानही याप्रसंगी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यात पडलेल्या ओला दुष्काळ व भिवंडीतील घर, गोदामांवर होणाºया कारवाईची निषेधात्मकप्रतिकृती देखील महोत्सवात साकारण्यात येणार आहे. प्रसिद्ध निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी हे या महोत्सवास भेट देण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली.