Bhiwandi: भिवंडीत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त जल्लोषाचे वातावरण
By नितीन पंडित | Published: January 20, 2024 06:17 PM2024-01-20T18:17:06+5:302024-01-20T18:17:41+5:30
Bhiwandi News: सोमवारी होणाऱ्या श्री.राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सर्व देशभर उत्साहाचे वातावरण संचारले असून भिवंडी शहरात सुध्दा जल्लोष पूर्ण भगवेमय वातावरण दिसून येत आहे.शहरातील मुख्य बाजारपेठा यांसह सर्व नागरी वस्त्यांमध्ये मंदिर परिसरात विद्युत रोषणाई सह भगव्या पताका झेंडे लाऊन सजविण्यात आले आहेत.
- नितीन पंडित
भिवंडी - सोमवारी होणाऱ्या श्री.राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सर्व देशभर उत्साहाचे वातावरण संचारले असून भिवंडी शहरात सुध्दा जल्लोष पूर्ण भगवेमय वातावरण दिसून येत आहे.शहरातील मुख्य बाजारपेठा यांसह सर्व नागरी वस्त्यांमध्ये मंदिर परिसरात विद्युत रोषणाई सह भगव्या पताका झेंडे लाऊन सजविण्यात आले आहेत.अनेक दुचाकी वाहनां वर युवकांकडून श्री रामाचे ध्वज लावण्यात आले असून अनेकांकडून ध्वज,भगवे पताका व दीप खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली असल्याने दुकानदारांनी सुध्दा या साहित्य विक्रीला प्राधान्य दिले आहे.अनेक राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांकडून शहरभर रस्त्यावर मेरे घर राम आये है असे फ्लेक्स बॅनर लावण्यात आले आहेत.तर अनेक ठिकाणी भजन कार्यक्रमांचे आयोजन मागील आठवड्या पासून सुरू आहे.
शहरातील पालिका मुख्यालयाच्या समोर असलेल्या स्व. धर्मवीर आनंद दिघे चौकात भगवे बॅनर पताका व आकाश कंदील लावण्यात आले असून उड्डाणपुलाखाली प्रभू श्री रामचंद्रांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. एकंदरीत शहरातील वातावरण भगवेमय झाले असून शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या कडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
यासोबतच ग्रामीण भागात ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.ग्रामीण भागात हरिनाम सप्ताह,भजन कीर्तन व मिरवणुका व पालिका कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे.