भिवंडी इमारत दुर्घटना: आरोपीला होणार कोणत्याही क्षणी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 11:50 PM2020-11-11T23:50:47+5:302020-11-11T23:54:37+5:30
भिवंडीतील इमारत दुर्घटना प्रकरणातील मुख्तार अहमद गुलाम रसूल फडोले या आरोपीचा अटकपूर्व जामीन ठाणे न्यायालयाने बुधवारी फेटाळला. दोन महिन्यांपूर्वी जिलानी इमारतीच्या पश्चिमेकडील भाग कोसळून ३८ जणांचा बळी गेला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भिवंडीतील इमारत दुर्घटना प्रकरणातील मुख्तार अहमद गुलाम रसूल फडोले या आरोपीचा अटकपूर्व जामीन ठाणेन्यायालयाने बुधवारी फेटाळला. दोन महिन्यांपूर्वी जिलानी इमारतीच्या पश्चिमेकडील भाग कोसळून ३८ जणांचा बळी गेला होता. आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्याच्या अटकेचा मार्ग आता मोकळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पटेल कंपाऊंडमधील ही इमारत २१ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळली होती. याप्रकरणी इमारत मालकाविरु द्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भिवंडी महापालिका प्रशासनाने या दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. त्याचबरोबर दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. ग्रामपंचायत काळात परवानगी न घेताच ही इमारत उभारली होती. इमारत
दुरु स्त करून सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी मालक आणि भोगवटादार यांनी पार पाडली नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही इमारतीची धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीमध्ये वर्गीकरण केले नसल्याचे काही निष्कर्ष समितीने काढले होते. नारपोली पोलिसांकडून इमारत मालकाचा शोध घेण्यात येत होता. दुसरीकडे मुख्तार अहमद गुलाम रसूल फडोले या आरोपीने ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
फडोले याने मुळ मालकाकडून रजिस्टर पॉवर आॅफ अॅटर्नी घेऊन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन मजल्याचे बांधकाम केले. त्यापैकी इमारतीमधील २६ घरेही त्यानेच विक्री केली. इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. जामीन मिळविणे हा आरोपीचा अधिकार आहे. परंतू तो मंजूर करतांना आरोपींना बेकायदेशीर कृत्य करण्याचा परवाना दिलेला नाही. समाजाची सुरक्षितता ही महत्वाची आहे. समाज सुरक्षित राहिला पाहिजे या बाबी जामीन मंजूर करताना पाहणे अपेक्षित आहे, असे निरीक्षण न्यायालयाने व्यक्त केल्याचे सरकारी वकील संजय मोरे यांनी सांगितले. तसेच आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग,त्याची भूमिका, आरोपीकडे करावयाची चौकशी तसेच गुन्ह्याची गांभीर्यता या सर्व गोष्टींचा विचार करून फडोल याचा न्यायाधीश आर.आर. वैष्णव यांनी अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला.