भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या चार, मालकाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 12:17 PM2017-11-25T12:17:29+5:302017-11-25T12:19:47+5:30

भिवंडी शहरातील कल्याण रोड-नवी वस्ती येथील वनजमिनीवर बांधलेली बेकायदा चार मजली इमारत शुक्रवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर  9 जण जखमी झाले आहेत.

Bhiwandi building accident: Number of death four | भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या चार, मालकाविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या चार, मालकाविरोधात गुन्हा दाखल

Next

भिवंडी : भिवंडी शहरातील कल्याण रोड-नवी वस्ती येथील वनजमिनीवर बांधलेली बेकायदा चार मजली इमारत शुक्रवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर  9 जण जखमी झाले आहेत. ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, इमारतीचा मालक महमद ताहीर रफीक बिजनोर (49) याला पोलिसांनी अटक केली आहे.

रुख्सार याकूब खान (18), अश्फाक मुश्ताक खान (38), जैबुन्निसा रफीक अन्सारी (61) व शिनाख्त परवीन खान (65 )अशी मृतांची नावे आहेत. रुख्सार आपल्या कुटुंबासह या इमारतीत राहत होती, तर एकूण नऊ जखमींपैकी ख्वाजा मोहम्मद सय्यद (55), रेहान खान (6), सलमा ताहीर अन्सारी (55), आबीद याकूब खान (21), आसीफ याकूब खान (21) हे गंभीर जखमी झाल्याने, त्यांना ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, तर शकील अल्लादीया अन्सारी (37), याकूब युसूफ खान (58) साबीरा याकूब पठाण (45) व इमराना खान (22) यांच्यावर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजूबाजूला दाट वस्ती असल्याने, बचावकार्य करणा-या कर्मचा-यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडथळे निर्माण झाले. त्यात बघ्यांची गर्दी होती. पाच वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या या इमारतीची माहिती प्रभाग अधिकारी सुनील भोईर यांच्याकडे उपलब्ध नव्हती. आपण काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारल्याचे सांगत, जबाबदारी त्यांनी झटकून टाकली. घटनास्थळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, महापौर जावेद दळवी, आमदार महेश चौघुले, रूपेश म्हात्रे, उपमहापौर मनोज काटेकर, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, तहसीलदार शशिकांत गायकवाड, उपायुक्त विनोद शिंगटे यांनी भेट देऊन, जखमी व मृतांच्या नातेवाइकांची विचारपूस केली.

क्लस्टर योजना राबविण्याची सूचना
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करून, ठाण्याच्या धर्तीवर तेथे क्लस्टर योजना राबविण्यासाठी पालिका अधिकाºयांना सांगितले, तर खासदार कपिल पाटील यांनीही क्लस्टर योजना राबविण्याच्या सूचना अधिकाºयांना केल्या.
नवी वस्तीमध्ये पालिकेच्या स्वच्छतागृहाच्या शेजारी पाच वर्षांपूर्वी वनविभागाच्या जागेवर ताहीरने चार मजल्यांची इमारत बांधली होती. या इमारतीत प्रत्येक मजल्यावर एक यानुसार चार कुटुंबे राहत होती, तसेच गच्चीवरही काही कुटुंबे राहत होती.तीन कुटुंबे बाहेर गेल्याने मोठी प्राणहानी टळली. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास इमारतीला अचानक भेगा पडून जोरदार आवाज होत ती कोसळली. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी, पोलीस तातडीने दाखल झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या ४० जवानांनी बचावकार्य सुरू केले. ढिगा-याखालून सात जणांना बाहेर काढले. 

Web Title: Bhiwandi building accident: Number of death four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.