Bhiwandi Building Collapse: मुलाच्या शोधासाठी बापाची वणवण; रोज ढिगाऱ्याजवळ येतो; शोध घेतो अन् अश्रू ढाळत घरी परततो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 01:06 AM2020-10-04T01:06:08+5:302020-10-04T01:07:24+5:30
Bhiwandi building collapse: अडीच वर्षांचा मुलगा मुसेफ आपल्याला सापडेल, अशी शब्बीरची भाबडी आशा आहे.
- नितीन पंडित
भिवंडी : धामणकरनाका परिसरात असलेल्या पटेल कम्पाउंड येथील जिलानी इमारत २१ सप्टेंबर रोजी कोसळली. यात ३८ जणांचा बळी गेला असून २५ जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेत अनेक परिवार उद्ध्वस्त झाले. तर, अनेक जण आपल्या परिवारातील सदस्यांच्या आठवणीत दिवस काढत आहेत. दुर्घटनेत कुणाची आई, वडील, भाऊ, बहीण तर कुणाचा मुलगा गेला.
आजही ही घटना आठवली तर या घटनेत आपला जीव वाचला, मात्र परिवार गमावलेल्या माणसांचे अश्रू वाहण्याचे थांबत नाही. या घटनेला १३ दिवस उलटून गेले, मात्र शब्बीर कुरेशी हा बाप आपल्या अडीच वर्षांच्या मुलाचा शोध घेण्यासाठी रोज ढिगाºयाजवळ येतो. अडीच वर्षांचा मुलगा मुसेफ आपल्याला सापडेल, अशी शब्बीरची भाबडी आशा आहे.
शब्बीर हा या दुर्घटनेत वाचलेला, मात्र परिवार उद्ध्वस्त झालेली एक व्यक्ती आहे. या दुर्घटनेत शब्बीर यांनी पत्नीसह दोन लहान मुले कायमची गमावली आहेत. शब्बीर यांची २८ वर्षीय पत्नी परवीन यांच्यासह चार वर्षांची मुलगी मरियम व अडीच वर्षांचा मुलगा मुसेफ असे तीन जण या दुर्घटनेत मृत्यू पावले आहेत.
तर, त्यांची दोन मुले आठ वर्षांचा सादिक व सहा वर्षांचा शाहीदही वाचले आहेत. मात्र, त्यांचा अडीच वर्षांचा मुसेफ हा आजही बेपत्ता आहे. बेपत्ता मुसेफच्या शोधासाठी शब्बीर रोज इमारतीच्या ढिगाºयाजवळ येऊन आपल्या चिमुरड्याचा शोध घेतो. दुर्घटनेनंतर चार दिवसांनी बचावकार्यही थांबले. मात्र, शब्बीरचा शोध मात्र थांबलेला नाही. केविलवाण्या चेहºयाने तो नित्यनेमाने शोधकार्य करत आहे.
१३ दिवस शब्बीर एकटाच ढिगाºयाच्या आजूबाजूला घुटमळताना दिसतो. शब्बीर ढिगाºयातील दगड, विटा व इतर मलबा बाजूला करतो व त्याखाली मुसेफचा शोध घेतो. मात्र, तो मिळत नसल्याने हताश व निराश होऊन पुन्हा थकल्या पावलांनी घरी परततो. मात्र दुसºया दिवशी पुन्हा ढिगाºयापाशी जाऊ न आपला मुलगा सापडतो का ते पाहतो.
‘कुटुंबाची आठवण अस्वस्थ करते’
भिवंडी : शब्बीर हा दुर्घटनाग्रस्त जिलानी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होता. इमारत कोसळली त्याआधी शब्बीरने आपल्या आजूबाजूच्या नागरिकांना झोपेतून उठवले होते व त्यांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला. मात्र, पत्नी व दोन मुलांना तो वाचवू शकला नाही. शब्बीरची पत्नी व मुलीचा मृतदेह बचाव पथकाने ढिगाºयाखालून काढला, मात्र अडीच वर्षांच्या मुसिफचा शोध आजही शब्बीर याला लागला नसल्याने रोज ढिगाºयाजवळ येतो.
मुसिफच्या आठवणीने तो बेचैन होतो. शब्बीर सध्या प्रचंड तणावाखाली आहे. मात्र, प्रशासन शब्बीरच्या परिस्थितीची दखल घेणार का, हा खरा प्रश्न आहे.
दरम्यान, मी रोज येथे येतो, मुलाचा शोध घेतो. मात्र, तो मिळत नसल्याने पुन्हा माघारी घरी जातो. मुलाची आणि परिवाराची आठवण मला अस्वस्थ करते.
माझा मुलगा मला मिळाला नाही, त्यामुळे मी माझ्या चिमुरड्याची कायम वाट पाहत राहीन, अशी भावनिक प्रतिक्रिया शब्बीर कुरेशी याने दिली.