Bhiwandi Building Collapse: घरमालकांचा हव्यास महागात पडला अन् भिवंडीत अनर्थ घडला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 07:51 PM2020-09-21T19:51:32+5:302020-09-21T20:00:13+5:30
पैशांच्या हव्यासापोटी घरमालकांनी घरं भाड्यानं दिली; कामगार पोहोचले मृत्यूच्या दाढेत
- नितिन पंडीत
भिवंडी: शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाउंड येथे तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. कोसळलेल्या इमारतीच्या शेजारीच दुसरी इमारत असल्याने सुरुवातील बचाव कार्यात अडचणी आल्या.
#UPDATE: Death toll rises to 13 in Bhiwandi building collapse incident. #Maharashtrahttps://t.co/rMG0Tns4YT
— ANI (@ANI) September 21, 2020
विशेष म्हणजे सुमारे 37 वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीला मनपा प्रशासनाने धोकादायक ठरवले होते. नोटीस देऊन जसे मनपा प्रशासनाने आपले हात झटकले त्याच पद्धतीने इमारत मालकाने सुरुवातीला सदनिका विकून आपले हात झटकले होते. नंतर इमारत धोकादायक ठरल्यानांतर सदनिका मालकांनी आपापल्या सदनिका रिकाम्या केल्या. मात्र त्या पुन्हा भाड्याने दिल्या होत्या. कमी भाड्याच्या लालसेपोटी शहरातील कामगारांनी या इमारतीत भाड्याने आपला संसार थाटला होता. मात्र भाड्याच्या लालसेने व पैशांच्या हव्यासाने इमारत मालकासह सदनिका मालकांनी गरीब भाडोत्री कुटुंबियांच्या जीवाची कोणतीही पर्वा केली नाही हे दुर्दैव.
भिवंडीत तीन मजली धोकादायक इमारत कोसळली; 10 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरूच
कमी घरभाडे असल्याने गरीब मजूर आपल्या कुटुंबांसह घरांमध्ये राहायला आले. मध्यरात्रीच्या सुमारास इमारत कोसळली आणि मोठा अनर्थ घडला. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून या दहा मृत व्यक्तींमध्ये दोन वर्षांपासून ते 14 वर्षांपर्यंत सात चिमुरड्यांचा समावेश आहे. त्यामुळे या निष्पाप जीवांना न्याय मिळणार का हाच खरा प्रश्न आहे.
भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत
सर्वात महत्वाचे म्हणजे भिवंडीत अनेक धोकादायक इमारतींचा प्रश्न आजही ऐरणीवर आहे. ज्या ज्या वेळेस भिवंडीत एखादी इमारत दुर्घटना घडते त्या त्या वेळेस क्लस्टर योजना राबविण्याचा मुद्दा पुढे येतो मात्र त्यासाठी आवश्यक बाबींचा पाठपुरावा होताना दिसत नाही. त्यामुळेच आजही शहरात अनधिकृत बांधकाम व धोकादायक इमारतींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मनपा प्रशासन फक्त नोटीस बजावून आपले हात झटकण्याचा प्रयत्न करत असते. मात्र धोकादायक ठरवल्यानंतर घरांमध्ये राहणाऱ्यांची काय याचा विचार होत नसल्याने हजारो नागरिक आजही अशा प्रकारच्या धोकादायक इमारतींमध्ये भाड्याने राहत आहेत. त्यामुळे आता तरी मनपा प्रशासन जागे होणार का असा सवाल सामान्य नागरिक विचारात आहेत.