वाढदिवसाच्या दिवशीच ‘त्याचा’ झाला पुनर्जन्म; ढिगाऱ्यातून २० तासांनी सुखरूप बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 06:18 AM2023-05-01T06:18:56+5:302023-05-01T06:19:15+5:30

भिवंडी इमारत दुर्घटना, शहरातील फुलेनगर परिसरात सुनील परिवारासह राहतो. सुनीलच्या वडिलांना लकव्याचा आजार असून, आई लहानपणीच वारली आहे.

Bhiwandi Building Collapse: Youth was reborn on his birthday; Safely out of the wreckage after 20 hours | वाढदिवसाच्या दिवशीच ‘त्याचा’ झाला पुनर्जन्म; ढिगाऱ्यातून २० तासांनी सुखरूप बाहेर

वाढदिवसाच्या दिवशीच ‘त्याचा’ झाला पुनर्जन्म; ढिगाऱ्यातून २० तासांनी सुखरूप बाहेर

googlenewsNext

नितीन पंडित

भिवंडी : इमारत दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली तब्बल २० तास अडकून राहिलेल्या तरुणाला सकाळी आठच्या सुमारास बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. विशेष महत्त्वाचे म्हणजे, या तरुणाचा रविवारी वाढदिवस असल्याने, या दिवशी मृत्यूच्या दारातून परत येत, पुनर्जन्मच झाल्याची भावना तरुणाने व्यक्त केली आहे. सुनील पिसाळ (वय ३०) असे दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. 

शहरातील फुलेनगर परिसरात सुनील परिवारासह राहतो. सुनीलच्या वडिलांना लकव्याचा आजार असून, आई लहानपणीच वारली आहे. चार महिन्यांपूर्वी जानेवारीत सुनीलचे लग्न झाले असून, पत्नी गर्भवती आहे, अशा परिस्थितीत घरातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, सुनील दुर्घटनाग्रस्त इमारतीत काम करत होता आणि शनिवारी अचानक इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुनील अडकून पडला होता. रविवारी सकाळी आठ वाजता २० तासांनंतर बचाव पथकाने त्याला सुखरूप बाहेर काढले. सकाळी बचाव पथकाचे काम सुरू झाल्यापासूनच सुनीलच्या जगण्याची आशा पल्लवीत झाली आणि सुनीलने बचाव पथकाच्या हाकेला हाक दिली. सुनीलच्या आवाजावरूनच अंदाज घेत, बचाव पथकाने सुनीलला बाहेर काढले. त्याने बचाव पथकाचे आभार मानले. ढिगाऱ्याखालून बाहेर येताच, मित्रांनी आणि नातेवाइकांनी सुनीलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

घर आणि मित्र परिवाराचे आशीर्वाद आणि बचाव पथकाच्या अथक मेहनतीनेच आज मला पुनर्जन्म मिळाला असून, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. - सुनील पिसाळ, सुखरूप बचावलेला तरुण.

Web Title: Bhiwandi Building Collapse: Youth was reborn on his birthday; Safely out of the wreckage after 20 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.