भिवंडी बस स्थानकाला तळ्याचे स्वरूप; शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा
By नितीन पंडित | Published: July 9, 2024 05:56 PM2024-07-09T17:56:40+5:302024-07-09T17:57:58+5:30
संपूर्ण बस आगार परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील बस स्थानकाची दुरावस्था झाली असून मागील काही दिवसां पासून सुरू असलेल्या पावसामुळे या संपूर्ण बस आगार परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे.त्यामुळे या परिसरात पाणी व चिखल साचल्याने बस स्थानकात येणारे नागरिक प्रवासी यांना बस स्थानकाच्या आवारात येत असताना चिखल व पाणी तुडवीत यावे लागत आहे.
या विरोधात मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने संपूर्ण परिसराची पाहणी करीत येथील दुरावस्था तात्काळ दूर करण्यात यावी,प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी यासाठी बस आगार व्यवस्थापक पटेल यांना निवेदन देऊन चर्चा केली आहे.
या वेळी शिवसेना सचिव महेंद्र कुंभारे,पदाधिकारी नाना झळके,दिलीप नाईक,उमेश कोंडलेकर,वैभव काठवले,निलेश केंकण,संतोष भावर्थे,कोमल पाटील आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.बस आगार व्यवस्थापक पटेल,मुख्य लिपिक चंद्रकांत जाधव यांच्या सोबत झालेल्या चर्चेत बस आगारातील समस्यांची येत्या आठ दिवसात उकल करून सुधारण न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख प्रसाद पाटील यांनी दिला आहे.