भिवंडी शहर विकास आराखड्याची माहिती मिळत नाही; माजी आमदारांची नाराजी
By नितीन पंडित | Published: October 18, 2023 03:36 PM2023-10-18T15:36:27+5:302023-10-18T15:37:00+5:30
येथील नागरिकांना विकास आराखड्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
नितीन पंडित
भिवंडी: शहराचा प्रारूप विकास आराखडा मनपा प्रशासनाच्या वतीने नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रारूप विकास आराखड्याची प्रिंट मनपा मुख्यालयाच्या तळमजल्यावर लावण्यात आली आहे. मात्र नकाशा स्वरूपात असलेल्या विकास आराखड्याबबत माहिती देण्यासाठी मनपा प्रशासनाने कर्मचारी नियुक्त केला नसल्याने येथील नागरिकांना विकास आराखड्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
विकास आराखड्याच्या नकाशाचे वाचन येथील नागरिकांना होत नसल्याने महापालिका प्रशासनाने या प्रारूप विकास आराखड्यात नेमकी काय प्रयोजने केली आहेत व त्यासाठी शहरातील कोणत्या भागातील स्थानिक नागरिकांच्या जमिनी व मालमत्ता बाधित होणार आहेत,तसेच कोणत्या भागाचा विकास होणार आहे याबद्दल नागरिक महापालिकेत येऊन विकास आराखड्याचा नकाशा पाहतात, मात्र माहिती देण्यासाठी कर्मचारी नसल्याने नागरिकांना या नकाशातून काहीही माहिती मिळत नसल्याने हिरमुसत नागरिक महापालिका प्रशासनातून परत जात आहे.
बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेश म्हात्रे महापालिका मुख्यालयात आले असताना त्यांनी या विकास आराखड्याकडे पहिले असता या विकास खड्याबाबत नागरिकांना काहीही समजत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी अपल्यापर्यंत पोहचविल्या असून आज प्रत्यक्ष विकास आराखडा पहिला असता त्याचा अर्थबोध सहजासहजी लागत नाही.महापालिकेने हा आराखडा केवळ दिखाव्या साठी लावला आहे का? असा सवाल देखील म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित करत विकास आराखडा समजण्यासाठी प्रशासनाने येथे मनुष्यबळ उपलब्ध करावा अशी मागणी देखील माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी केली आहे.