भिवंडीत उड्डाणपुलाचा भाग कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:36 AM2019-09-05T01:36:25+5:302019-09-05T01:36:42+5:30
दुसऱ्यांदा घडली घटना : वाहतूक बंद ठेवल्याने झाली कोंडी
भिवंडी : कल्याण नाका येथील उड्डाणपुलाचा भाग मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहतूक पोलीस कार्यालयाजवळ कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रात्री हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने काही काळ कोंडी झाली होती.
भिवंडी - कल्याण रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन वर्षांपासून एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे बांधकाम हाती घेतले आहे. या साडेतीन किलोमीटर लांबीच्या साईबाबा ते कल्याण नाका दरम्यानच्या उड्डाणपुलासाठी १८४ कोटी खर्च येणार आहे. या कंपनीच्या बांधकामाचे कंत्राट जेएमसी या कंपनीला दिले आहे.
मात्र कंत्राटदार कंपनीच्या भ्रष्ट व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मागीलवर्षीही उड्डाणपुलाच्या खांबाला तडा जाऊन स्लॅब कोसळण्याची घटना घडली होती. त्यामुळे खांबाला जॅक लाऊन काही महिने टांगून ठेवले होते. त्यातच मंगळवारी रात्रीच्या सुमारास या उड्डाणपुलाच्या खांबावरील दोन रॅम्पला जोडण्याचे काम सुरू असताना या पुलाचा काही भाग कोसळला. या पुलाचा भाग कोसळण्याची ही दुसरी घटना असल्याने वारंवार होणाºया या दुर्घटनांमुळे उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
दरम्यान, या पुलाच्या निकृष्ट कामाबाबत कल्याण रोड व्यापारी व रहिवासी संघर्ष समितीच्या वतीने एमएमआरडीए व पालिका आयुक्तांकडे अनेकवेळा लेखी तक्र ारी केलेल्या आहेत.
अहवाल देण्यास टाळाटाळ
मागीलवर्षी जेव्हा उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला होता त्यावेळी संघर्ष समितीच्या वतीने या घटनेची चौकशीची मागणी केली होती. या मागणीनंतर सरकारच्या वतीने यासंदर्भातील अहवाल तयार करून या उड्डाणपुलाचे काम आठ महिने थांबविण्यात आले होते. विशेष म्हणजे हा अहवाल एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याची खंत कल्याण रोड व्यापारी व रहिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष शादाब उस्मानी यांनी व्यक्त केली आहे.