भिवंडी गुन्हे शाखेचे कामगिरी; मदरशांमधून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन
By नितीन पंडित | Published: November 23, 2022 06:00 PM2022-11-23T18:00:36+5:302022-11-23T18:01:43+5:30
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
भिवंडी येथील मदरशांमधून पळून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा देवनार मुंबई येथून भिवंडी गुन्हे शाखेने शोध घेत भिवंडीत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी बुधवारी दिली.
भिवंडी शहरातील फक्की कंपाऊंड, अमानिशा तकीया मस्जिद येथील अशरफीया मदरसा मध्ये मोह कलीम अब्दुल कुदरूस वय १३ वर्षे ६ महिने रा. गायत्री नगर व मोहम्मद तौसीफ मेहबुब आलम वय १३ वर्षे १० महिने मूळगाव पश्चिम बंगाल येथील दोन अल्पवयीन मुले वास्तव्यास होती. १६ नोव्हेंबर रोजी रात्री ही दोन्ही अल्पवयीन मुले मदरशामध्ये आढळून न आल्याने त्यांचा कोणीतरी अपहरण केल्याचा संशय व्यक्त करीत मदरसा चालक मोहम्मद सैदुलमा अन्वर उल हक शेख यांनी याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणी भिवंडी गुन्हे शाखा समांतर तपास करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील पोलीस हवालदार साबीर शेख, निकुंब, बर्वे, राजपूत, रोशन यांनी माहितीच्या आधारे तपास करीत मुंबई देवनार येथून या दोन्ही मुलांचा शोध घेतला. त्यांना ताब्यात घेऊन भोईवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या गुन्ह्यात कोणताही मागोवा नसताना भिवंडी गुन्हे शाखेने अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेतला आहे.