भिवंडीत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर उद्घाटन सोहळा संपन्न
By नितीन पंडित | Published: October 22, 2023 05:50 PM2023-10-22T17:50:57+5:302023-10-22T17:51:07+5:30
भिवंडी न्यायालयाची भव्यदिव्य इमारत उभी राहिली नंतर अवघ्या एक वर्षात या इमारती मध्ये अतिरिक्त सत्र न्यायालय व वरिष्ठ स्तर पूर्णवेळ न्यायालय सुरू होत आहे.
भिवंडी : शहरातील मागील कित्येक वर्षांपासून असलेली मागणी फलद्रूप होत भिवंडी न्यायालय इमारती मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन रविवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती गौरी गोडसे न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले .याप्रसंगी व्यासपीठावर ठाणे जिल्हा प्रधान न्यायाधीश अमित शेटे,भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवणकुमार गुप्ता,दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधीश अभिजित डोईफोडे,महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य अँड गजानन पाटील,भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.दिनेश्वर पाटील उपस्थित होते तर कार्यक्रमास मोठ्या संख्येने जिल्ह्यातील न्यायाधीश,वकील तथा नागरीक उपस्थित होते.
भिवंडी न्यायालयाची भव्यदिव्य इमारत उभी राहिली नंतर अवघ्या एक वर्षात या इमारती मध्ये अतिरिक्त सत्र न्यायालय व वरिष्ठ स्तर पूर्णवेळ न्यायालय सुरू होत आहे. हे भिवंडी शहरातली वकीलांसह पक्षकार नागरिकांसाठी भाग्याचे आहे असे प्रतिपादन न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी करीत तालुका पातळीपासून राष्ट्रीय स्तरावर प्रलंबित न्याय प्रकरणांची संख्या मोठी आहे .प्रलंबित खटले व विलंबाने मिळणारा न्याय यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून ,सुविधांचा वापर करून गतिमान न्याय प्रक्रिया राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी केले.
या प्रसंगी न्यायमूर्ती गौरी गोडसे, न्यायमूर्तीं अभय मंत्री यांची सुध्दा भाषणे झाली.वाढती लोकसंख्या व त्यातून निर्माण होणारे वाद ,औद्योगिक प्रगती लक्षात घेऊन भिवंडी न्यायालयात भविष्यात लवकर कामगार,औद्योगिक. व कौटुंबीक न्यायालय सुरू करावे अशी मागणी प्रास्ताविकातून करण्यात आली.या प्रसंगी न्यायालय प्रांगणात बनविण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन देखील करण्यात आले तर भिवंडी बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
जागेचा अभाव व मनुष्यबळाची कमतरता असल्याने मागील कित्येक वर्षांपासून भिवंडी शहरातली जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय रखडले होते.५ ऑक्टोंबर २०२२ रोजी भिवंडी न्यायालयाच्या भव्य इमारतीचे लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या शुभहस्ते पार पडल्यानंतर या मागणीने जोर धरला होता आणि आज या न्यायालयाच्या उदघाटनाने भिवंडीतील वकिलांनी समाधान व्यक्त केले.