भिवंडीची निवडणूक लांबणीवर?
By admin | Published: April 18, 2017 06:38 AM2017-04-18T06:38:34+5:302017-04-18T06:38:34+5:30
भिवंडी-निजामपूरच्या मतदारयाद्यांत २५ टक्के नावे बोगस असल्याचा आणि सुमारे ५० हजार नावे दुसऱ्यांदा आल्याचा मुद्दा उपस्थित करणारी नवी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे
भिवंडी : भिवंडी-निजामपूरच्या मतदारयाद्यांत २५ टक्के नावे बोगस असल्याचा आणि सुमारे ५० हजार नावे दुसऱ्यांदा आल्याचा मुद्दा उपस्थित करणारी नवी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. आधीच दोन प्रभागांतील बोगस आणि दुबार नावांबद्दल याचिका दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिकांवर शुक्रवारी, २१ एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्यामुळे मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यास आयोगाने मनाई केल्याने भिवंडीच्या निवडणुका लांबणीवर गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भिवंडीसोबतच मालेगाव आणि पनवेलच्या निवडणुकांचा कार्यक्रमही लांबणीवर गेला आहे. मतदारयाद्या अद्ययावत झाल्यावर निवडणूक प्रक्रिया घोषित होईल आणि निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यावर ४० दिवसांत मतदान होईल. त्यासाठी या आठवड्यात कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र याचिकांची सुनावणी पुढे गेल्याने निवडणूक प्रक्रिया लांबल्याचे मानले जाते. मे महिन्यात निवडणूक होऊ नये अशी भिवंडीतील बहुतेक सर्व राजकीय पक्षांची इच्छा होती. याद्यांतील घोळामुळे ती पूर्ण होईल, असे मानले जाते.
महापालिकेच्या निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या मतदारयादीत बोगस नावे आहेत आणि काही नावे दुसऱ्यांदा (दुबार) घुसविल्याने प्रभाग क्र. १७ आणि १८ मधून याचिका दाखल झाल्या आहेत. त्यांची सुनावणी सोमवारी होती. त्याचवेळी भिवंडी डेव्हलपमेंट फ्रन्टचे निमंत्रक फाजील अन्सारी यांनी सर्व मतदारसंघांतील बोगस नावांविरूध्द याचिका दाखल केली आहे.
मतदारयादीतील घोळाविरोधात संजय काबूकर व सिध्देश्वर कामूर्ती यांची याचिका आणि फ्रन्टच्या याचिकेवर शुक्रवारी एकत्रित सुनावणी होणार आहे.
पुणे येथील एका एजन्सीकडून मतदारयाद्यांची तपासणी करण्यात आली होती. ९० वॉर्ड असलेल्या २३ प्रभागात ५०,९२२ मतदारांची नावे दुसऱ्यांदा आली आहेत आणि संपूर्ण पालिका क्षेत्रात सुमारे २५ टक्के नावे बोगस आहेत, असा दावा फ्रन्टने केला. याचा फटका प्रामाणिकपणे निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला बसेल, असे त्यांचे म्हणणे आहे. पालिकेचा निवडणूक विभाग, जिल्हा व राज्य निवडणूक विभागाने याची दखल न घेतल्याने न्यायालयात दाद मागितल्याची माहिती अन्सारी यांनी दिली.
याचवेळी कामतघर भागातील इच्छुक उमेदवाराला लाभ होईल अशा पद्धतीने मतदारांची नावे त्यांच्या यादीत टाकण्यात आल्याचा आरोपही करण्यात आल्याने ेयादीतील घोळाचा तिढा वाढला आहे. निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या सीमारेषेचा पालिकेच्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी कामतघरमध्ये भंग केल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सदस्य श्याम अग्रवाल यांनी केला व संबंधित कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांना दिले. निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या सीमारेषेप्रमाणे कामतघरमधील प्रभाग क्र. २२ व २३ च्या मतदारयादीत मतदारांची नावे समाविष्ट करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)