बुलेट ट्रेनच्या ६१ हेक्टर शेत जमिनीच्या मोजणीस भिवंडीतील शेतकरी तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 08:30 PM2019-01-11T20:30:58+5:302019-01-11T20:37:37+5:30
१३१ खातेदार शेतकऱ्यांना पूर्ण विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही केली जाईल असे डॉ. नळदकर यांनी सांगितले. बुलेटट्रेनसाठी लागणाऱ्यां शेत जमिनीसाठी विशेषत: अंजूर , भरोडी , हायवेदिवे येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. त्यावर तोडगा निघावा यासाठी भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर व शेतकरी संघटनेचे अॅड. भारव्दाज चौधरी, हिरा पाटील यांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा सुरु होती.
ठाणे : बुलेट ट्रेनसाठी भिवंडी तालुक्यातील ६१ हेक्टर शेत जमीन लागणार आहे. या जमिनीच्या संयुक्त मोजणीस शेतकऱ्यांनी एकमुखी संमत्ती दिली असल्याचा दावा करण्यात येत आहे. यासाठी प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांच्या दालनात शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. त्यात शेतकऱ्यांनी जमीन मोजणीस होकार दिल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
या बुलेट ट्रेनच्या भूसंदपादनासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी व जिल्हा प्रशासनाची सातत्याने चर्चा सुरु आहे. भिवंडीमधील शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनच्या संयुक्त जमीन मोजणीस आता हिरवा कंदील दाखविल्यामुळे आता पुढील आंमलबजावणीला वेग येणार आहे. भिवंडी तालुक्यातील ६१ हेक्टर जमिनीची मोजणी होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. एकंदरीत १३१ खातेदार शेतकऱ्यांना पूर्ण विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही केली जाईल असे डॉ. नळदकर यांनी सांगितले.
बुलेटट्रेनसाठी लागणाऱ्यां शेत जमिनीसाठी विशेषत: अंजूर , भरोडी , हायवेदिवे येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. त्यावर तोडगा निघावा यासाठी भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर व शेतकरी संघटनेचे अॅड. भारव्दाज चौधरी, हिरा पाटील यांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा सुरु होती. शेतकऱ्यांनी काही अटी कायम ठेवून संयुक्त जमीन मोजणीस होकार दिला आहे. यामुळे १७ ते १९ जानेवारी दरम्यान अंजूर, भरोडी, हायवेदिवे येथील १२९ खातेधारक शेतकऱ्यांच्या ६०.६४ हेक्टर जमिनीची मोजणी करण्याचे नियोजन निश्चित केले आहे. या बैठकील हायस्पीड ट्रेनचे नायक, उप अधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद ठुबे आदींची देखील उपस्थिती होती.
* शेतकऱ्यांच्या या अटी मान्य -
या शेतजमीन बाधित शेतकऱ्यांना मोबदला ठरविण्यासाठी नेमलेल्या शासकीय समितीमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नेमावा, बुलेट ट्रेन मार्गिकेला समांतर असलेला सर्व्हिसरोड भरोडी येथे संपतो, त्यामुळे प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गिकेला समांतर असलेल्या सर्व्हिसरोडला भरोडी ते म्हातारडी, डोंबिवली यांना जोडणारा सर्व्हिसपूल द्यावा . तसेच प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी सुरई,भरोडी व अंजूर या भागात कारशेड प्रस्तावित आहे. या कारशेडमध्ये स्थानिक भूमीपुत्राना केवळ मजूर म्हणून नोकरी न देता त्यांना कौशल्यकामाची नोकरी द्यावी.त्यासाठी मुलांना स्वखर्चाने प्रशिक्षीत करून त्यांना प्राधान्याने सामावून घ्यावे अशा काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.