Bhiwandi: अखेर भिवंडीतील दोन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
By नितीन पंडित | Published: December 27, 2022 05:47 PM2022-12-27T17:47:15+5:302022-12-27T17:47:51+5:30
Bhiwandi:मंगळवारी विधान परिषदेमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर व विद्यमान उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे.
- नितीन पंडित
भिवंडी - भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालय मागील तीन ते चार वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून अनेक शासकीय प्रकल्पासाठी भूसंपादन करीत असलेल्या जागेचे व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत अखेर मंगळवारी विधान परिषदेमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर व विद्यमान उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे.
भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातून मुंबई बडोदरा महामार्ग,बुलेट ट्रेन ,समृद्धी महामार्ग यांसह अनेक प्रकल्प जात असून त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांचा कोट्यवधींचा मोबदला देताना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आली आहेत.त्यामध्ये साडे अकरा कोटींचा भ्रष्टाचार , मोबदला परस्पर बोगस शेतकऱ्यांना देणे ,त्या नंतर ५८ लाखांचा मोबदला मयत आदिवासी महिलेच्या जागी बोगस महिला उभी करून लाटण्यात आल्याचे समोर आले .
या प्रकरणी गुन्हे दाखल असतानाच अंजुर येथील आदिवासी शेतकरी उंदऱ्या दोडे यांच्या बुलेट ट्रेन मध्ये बाधित जमिनीचा मोबदला देण्यास उपविभागीय अधिकारी बाळासाहे वाकचौरे हे टाळाटाळ करीत असल्याने दरम्यानच्या काळात उंदऱ्या दोडे यांचे निधन झाल्याने उपविभागीय अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांनी केली असता त्या वरील चर्चेस उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर व विद्यमान उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या वर शासन निलंबनाची कारवाई करीत असल्याची घोषणा केली.या कारवाई नंतर महसूल विभागात एकच खळबळ माजली असून ,अजून बरेच मोठे मासे या प्रकरणात अडकणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे .