भिवंडीत आगीचे सत्र सुरूच; प्लास्टिक मोती कारखाना जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 10:48 AM2020-09-30T10:48:33+5:302020-09-30T10:49:38+5:30
देऊनगर येथील इमारतीत तळ मजल्यावर फारुख खान यांचा प्लास्टिक मणी बनविण्याचा कारखाना असून त्यावरील पहिल्या मजल्यावर दहा खोल्या आहेत त्यापैकी नऊ खोल्यांमध्ये कामगार राहत होते .
- नितिन पंडीत
भिवंडी : भिवंडी शहरात आगी चे सत्र सुरूच असून शहरा नजीकच्या गोदाम पट्ट्यात आगीच्या घटना नियमित होत असतानाच मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास महानगरपालिका क्षेत्रातील नालापार देऊनगर येथील प्लास्टिक मोती बनविणाऱ्या कारखान्यात भीषण आगीची घटना घडली आहे . या आगीत कारखाना जाळून खाक झाला आहे मात्र या इमारतीत राहणाऱ्या कामगारांच्या प्रसंगावधानाने सुदैवाने जिवीत हानी टळली आहे. दरम्यान अग्निशमन दलाने घटना स्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
देऊनगर येथील इमारतीत तळ मजल्यावर फारुख खान यांचा प्लास्टिक मणी बनविण्याचा कारखाना असून त्यावरील पहिल्या मजल्यावर दहा खोल्या आहेत त्यापैकी नऊ खोल्यांमध्ये कामगार राहत होते . रात्री या आगीची घटना घडल्या नंतर प्रसंगावधान राखीत पहिल्या मजल्यावरील कामगार इमारती बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली असून या आगीत कारखान्यातील यंत्रसामुग्री , कच्चा व तयार माल जाळून खाक झाला आहे .आगीचे करण अजून स्पष्ट नसले तरी या इमारतीच्या समोर असलेल्या भंगार दुकानात धाग्याचे कागदी कोम वायांडिंग करण्याचे काम सुरू असताना शॉर्ट सर्किट ने ही आग लागल्याचे बोलले जात असून येथील आग भडकल्या नंतर ती आग पसरत या मध्ये प्लस्टिक कारखाना जाळून खाक झाला आहे .
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा करून या आगीवर नियंत्रण मिळविले आहे . विशेष म्हणजे शहरात अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये मोती व यंत्रमाग कारखाने असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वारंवार वर्तविण्यात येत असून मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तर अनेक आगीच्या घटनांमध्ये इन्शुरन्सचा देखील वास येत असल्याचे बोलले जात आहे.