भिवंडीत गोदामाला भीषण आग ; आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
By नितीन पंडित | Published: December 24, 2022 06:13 PM2022-12-24T18:13:20+5:302022-12-24T18:15:38+5:30
या भीषण आगीत लाखो रुपयांच्या टिशू पेपरचे रोल जळून खाक झाले आहे.मात्र आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.
भिवंडी - भिवंडीतील ग्रामीण भागातील दापोडे गावातील कृष्णा कॉम्प्लेक्स गोदाम संकुलात अरोनिया या कंपनीच्या टिशू पेपरच्या गोदामाला शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.दरम्यान या आगीच्या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसून गोदामातील साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानी दिली आहे. या आगीवर गेल्या साडे चार तासापासून नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहेत असून ही आग आटोक्यात येण्यासाठी आणखी २ ते ३ तास लागण्याची शक्यता अग्निशमन दलाकडून वर्तविली जात आहे. या भीषण आगीत आतापर्यत लाखो रुपयांचे टिशू पेपरचे रोल जळून खाक झाले आहे.मात्र आगीचे कारण अद्यापही समजू शकले नसून आग विझवण्यासाठी अडचण येत असल्याने जवानांनी जेसीबीच्या सहाय्याने गोदामाची भिंत तोडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.या आगीच्या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.