वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भिवंडी परिसरातील गोदामांना तीन वेगवेगळ्या सुट्ट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 03:28 PM2018-09-09T15:28:02+5:302018-09-09T15:45:57+5:30
भिवंडी भागातील गोदामांना आठवड्यातील तीन सुट्ट्या निश्चित करून देण्यात आल्या आहेत.
ठाणे - वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भिवंडी भागातील गोदामांना आठवड्यातील तीन सुट्ट्या निश्चित करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी निश्चितपणे कमी होईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिली.
भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याचा दृष्टीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत सूचना केल्या होत्या. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यासंदर्भात प्रांत अधिकारी व तहसीलदारांना वाहतूक संघटना व गोदाम मालकांची बैठक तातडीने घेण्याचे निर्देश दिले होते.
गोदामांकरता रविवारची एक दिवसांची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली असून पूर्णा, राहनाळ परिसरातील गोदामे मंगळवारी तर काल्हेर, कशेळी भागातील बुधवारी, तसेच दापोडे, वळ भागातील गोदामे शुक्रवारी बंद राहतील.
सुट्ट्या विभागल्याने वाहतूकीचा ताण येणार नाही. या बैठकीस तहसीलदार शशिकांत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त अविनाश मोहिते वाहतूक भिवंडी, पोलीस निरीक्षक राजन रास्ते, एम एन सातदिवे, आर पी भामे, गोदाम प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.