भिवंडीत ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 05:21 PM2021-01-13T17:21:17+5:302021-01-13T17:21:53+5:30
Gram Panchat Election : भिवंडी तालुक्यातील ५३ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी १५ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे
- नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी तालुक्यातील ५३ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी १५ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मागील पंधरा दिवसांपासून निवडणूक रिंगणार उतरलेल्या उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात आप आपला प्रचार केला आहे. शुक्रवारी ही निवडणूक होणार असल्याने बुधवारी सायंकाळी आदर्श आचार संहिता लागू झाल्याने या प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता निवडणूक पार पडे पर्यंत उमेदवारांना जाहीर प्रचार फेऱ्या काढता येणार नाहीत.
निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असल्याने उमेदवारांनी आप आपली शक्ती व युक्ती लावून आता आतला प्रचार सुरु केला आहे. रात्र वैऱ्याची या युक्ती प्रमाणे बुधवार व गुरुवार या दोन रात्रींमध्ये मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखविण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून होण्याची शक्यता असल्याने रात्रीस खेळ चाले यानुसार सर्व उमेदवार आता या दोन रात्रींमध्ये स्वतः सह पॅनल च्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी या दोन रात्रींमध्ये प्रचंड प्रयत्न करणार असल्याने या दोन रात्री उमेदवार व त्यांच्या समर्थकांसाठी वैऱ्याची रात्र ठरणाऱ्या आहेत.
दरम्यान ठाणे ग्रामीण पोलिसांबरोबरच ठाणे शहर पोलीसांच्या अखत्यारीत असलेल्या या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तालुका पोलीस ठाण्यासह परिमंडळ दोन च्या अखत्यारीतील कोनगाव, निजामपुरा, नारपोली पोलिसांनी आप आपल्या कार्यकक्षेत विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला असून उमेदवारांच्या हालचालींकडे देखील पोलिस प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे.