Bhiwandi Gram panchayat Elections: भिवंडीतील १३ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान
By नितीन पंडित | Published: December 18, 2022 06:28 PM2022-12-18T18:28:47+5:302022-12-18T18:30:09+5:30
१४४ पैकी १२ सदस्य बिनविरोध, उर्वरित १३२ ग्रामपंचायत सदस्यांसाठी मतदान
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: भिवंडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या मतदानाला रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली.भिवंडी तालुक्यातील एकूण १४ ग्रामपंचायतच्या निवडणुकांची घोषणा झाली होती.त्यापैकी एकनाथ शिंदे गटातील आमदार शांताराम मोरे यांच्या खानिवली या गावातील सरपंच व सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित १३ ग्रामपंचायतीसाठी १३ थेट सरपंच तर १४४ पैकी १२ सदस्य बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित १३२ ग्रामपंचायती सदस्य निवडी करता मतदान झाले.
कारीवली, कोनगाव, कशेळी, कोपर, कांबे या ग्रामपंचायती मधील निवडणूका प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या होत असून भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिघांकडून मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी तुल्यबळ अशा लढती होत आहेत. सकाळी साडेसात ते दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ६९.८७ टक्के मतदान पार पडले होते.
भिवंडीतील कोन गावात भाजपा विरोधात शिंदे गटात चुरस
भिवंडी कल्याण रस्त्याच्या सीमेवरील कोनगाव ही झपाट्याने शहरीकरण होत असलेली ग्रामपंचायत चर्चेत असून या ठिकाणी तब्बल १७ ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यायचे असल्याने मोठी चुरस दिसून येत आहे .विशेष म्हणजे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वर्चस्व असलेली ग्रामपंचायत ओळखली जात असताना त्यांचे कट्टर विरोधात सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपा बंडखोर उमेदवार डॉ रुपाली कराळे यांच्या सोबत हातमिळवणी करून या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला कडवे आव्हान दिले आहे.या दोघांमध्ये या निवडणुकीत बाजी कोण मारतं ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.