Bhiwandi: भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय डबघाईला; यंत्रमाग व्यवसाय राहणार वीस दिवस बंद
By नितीन पंडित | Published: October 31, 2023 06:34 PM2023-10-31T18:34:30+5:302023-10-31T18:34:50+5:30
Bhiwandi News: यार्नमधील सट्टेबाजारी,वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार व व्यवसायातील प्रचंड मंदी यामुळे शहरातील यंत्रमाग व्यवसायाचे कंबरडे मोडले असून व्यावसायिकांनी तयार केलेल्या कापडाची विक्री होत नसल्याने लाखो मीटर कापड बनवून कारखान्यांमध्ये पडलेला आहे.
- नितीन पंडित
भिवंडी - कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यवसाय डबघाईला आला आहे. यार्नमधील सट्टेबाजारी,वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार व व्यवसायातील प्रचंड मंदी यामुळे शहरातील यंत्रमाग व्यवसायाचे कंबरडे मोडले असून व्यावसायिकांनी तयार केलेल्या कापडाची विक्री होत नसल्याने लाखो मीटर कापड बनवून कारखान्यांमध्ये पडलेला आहे. यंत्रमाग व्यवसायातील मंदीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्यापारी एकता गृप या यंत्रमाग युनियनच्या वतीने बुधवारी १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पासून २० दिवसांचा बंद पुकारला आहे.
विजेची दरवाढ व व्यवसायातील मंदी यामुळे शहरातील छोटे यंत्रमाग व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत.मात्र दुसरीकडे यंत्रमाग व्यावसायातील बड्या व्यापाऱ्यांनी या व्यवसायात आपले बस्तान मजबूत केल्याने बड्या व्यापाऱ्यांचे कारखाने शहरात दिवस रात्र सुरु आहेत. या बड्या व्यावसायिकांचा कापड देशातील विविध राज्यांबरोबरच परदेशातही जात असल्याने या बड्या व्यावसायिकांना मंदीचा फटका सहजासहजी बसत नाही मात्र शासकीय धोरण व सततची वीज दरवाढीमुळे छोट्या व्यवसायिकांना मंदीचा त्रास सहन करावा लागत आहे.
कापड व्यवसायाच्या मंदीमुळे छोटे व्यापारी एकत्र येऊन त्यांनी एक नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर असा वीस दिवसांसाठी यंत्रमाग कारखाने ऐन दिवाळी सणात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या बंदमुळे यंत्रमाग व्यवसायात आलेली मंदी कमी होण्याची शक्यता या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे बड्या व्यापाऱ्यांनी दिवाळी काळातील कापड मालाचे व्यवहार केले असल्याने त्यांना कंपन्यांना कापड पुरविणे गरजेचे होणार असल्याने बड्या व्यापाऱ्यांनी या आंदोलना वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या यंत्रमाग आंदोलनात देखील दोन गट पडले असल्याचे बोलले जात आहेत. मात्र यंत्रमाग व्यापाऱ्यांनी बंद बाबत पुकारलेल्या मागण्या रास्त असल्याचेही या बड्या व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. यंत्रमाग व्यावसायिकांनी पुकारलेल्या या बंद मुळे शहरातील लाखो यंत्रमाग कामगारांवर देखील एन सणात परिणाम होणार आहे.