भिवंडीत जिजाऊ संघटनेने साजरी केली कृतज्ञता भाऊबीज
By नितीन पंडित | Published: October 28, 2022 04:54 PM2022-10-28T16:54:11+5:302022-10-28T16:54:26+5:30
सरकार करेल तेव्हा करेल समाजाच्या विकासासाठी मदत करायला पुढे येणे गरजेचे आहे असेही निलेश सांबरे यांनी स्पष्ट केले.
भिवंडी - आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका या खऱ्या समाजासाठी झटणाऱ्या रणरागिणी असून त्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी केले आहे .शुक्रवारी ते भिवंडी पद्मानगर येथील पद्मशाली समाज सभागृह येथे आयोजित कृतज्ञता भाऊबीज कार्यक्रमात बोलत होते.याप्रसंगी पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाचे प्राचार्य सुधीर घागस, शिवअंगणवाडी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा वैशाली मेस्त्री, शिवसेना बाळासाहेबांची गटाचे शहर उपाध्यक्ष संजय काबूकर,अखिल पद्मशाली समाज अध्यक्ष रामकृष्ण पोटाबत्तीनी, महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ बुशरा सय्यद,जिजाऊ संघटनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षा मोनिका पानवे यांसह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
शैक्षणिक व राजकीय भ्रष्टाचार करणाऱ्यांना समजा बद्दल काही ही पडलेले नाही आशा परिस्थितीत जिजाऊ हा गरिबांचा कष्टकरी सर्वधर्मीय समाजाचे कुटुंब आहे ,या मातीतला प्रत्येक जण आपला आहे ,या भावनेतून निस्वार्थी भावनेतुन काम करण्याची गरज आहे आणि ते काम जिजाऊ करीत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगत समाजचे काम करणारी पिढी आपल्याला घडवायची आहे ,पीडिताला मदत करणे आपली जबाबदारी आहे, सरकार करेल तेव्हा करेल समाजाच्या विकासासाठी मदत करायला पुढे येणे गरजेचे आहे असेही निलेश सांबरे यांनी स्पष्ट केले.
तुटलेली नाती निस्वार्थ भावनेने कशी जोडावी यासाठी निलेश सांबरे हे काम निस्वार्थी भावनेतून करीत आहेत,करोना काळात लाखो रुपये पगार घेणारे वर्क फ्रॉम होम होते तर तीन चार हजार रुपयांच्या तुटपुंजा मानधना वर काम करणाऱ्या आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका यांचे काम धैर्याचे होते म्हणून हा कृतज्ञता भाऊबीज सोहळा आगळावेगळा आहे असे प्रतिपादन सुधीर घागस यांनी केले .या कार्यक्रमा दरम्यान भिवंडी शहर व भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात कार्यरत अंगणवाडी सेविका,मदतनीस आशा वर्कर्स अशा तब्बल एक हजार महिलांची पैठणी सह चांदीची जिजाऊ शिवबा ही प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्षा मोनिका पालवे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी पंकज पवार ,कैलास भोईर फराज शेख,कैलास भोईर, समृद्धी ठाकरे यांनी विशेष मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र मांजरेकर यांनी केले.