एमएमआरडीएकडे भिवंडी-कल्याण रोड उड्डाणपुलाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 03:41 AM2019-11-17T03:41:55+5:302019-11-17T03:42:10+5:30
साईबाबा मंदिर ते कै. राजीव गांधी चौकदरम्यान हा उड्डाणपूल असून उड्डाणपुलाची लांबी ३ किमी तर रुंदी ८.५० मीटर इतकी आहे.
मुंबई : भिवंडी ते कल्याण रोड या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची आणि देखभालीची जबाबदारी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) सोपविण्यात आली आहे.
साईबाबा मंदिर ते कै. राजीव गांधी चौकदरम्यान हा उड्डाणपूल असून उड्डाणपुलाची लांबी ३ किमी तर रुंदी ८.५० मीटर इतकी आहे. दोन पदरी मार्गिका असलेल्या या उड्डाणपुलाच्या ७८ सांध्यांपैकी ७७ साध्यांची कामे करण्यात आली आहेत.
भिवंडी ते कल्याण रोड या उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेंची लांबी ६ किमीची आहे. मात्र या पुलाचे काम करताना वाहतूक सुरू ठेवावी लागणार आहे.
या पुलाची रुंदी कमी असल्याने एका मर्गिकेवरून वाहतूक सुरू ठेवणे कठीण असल्याने २.३ किमी लांबीच्या मार्गाची योजना आखण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आले.
हा उड्डाणपूल राजीव गांधी चौकातील विद्यमान पुलाला जोडला जाईल. काही समस्यांमुळे भिवंडी महानगरपालिकेकडून या जुन्या उड्डाणपुलाचे काही दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे.
उड्डाणपुलाच्या उताराच्या भागाच्या दुरुस्तीचे काम करण्यास थोडा वेळ लागत असल्याने साईबाबा मंदिर ते दांडेकर कंपनीजवळ रॅम्पजवळील भागाकडे वाहतूक वळविण्यात आली आहे.
कल्याण ते भिवंडी दिशेने जाणाऱ्या एका मार्गाची वाहतूक १६ नोव्हेंबरपासून उड्डाणपुलावरून वळविण्यात आली आहे. यामुळे उड्डाणपुलाच्या उताराच्या भागाचे डांबरीकरणाचे काम होऊ शकणार आहे.