भिवंडी-कल्याण-शीळ रोडच्या विस्तारीकरणात एक हजार ४० झाडांची होणार कत्तल ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 03:55 AM2017-10-28T03:55:40+5:302017-10-28T03:55:51+5:30
कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रोड सहापदरी होणार आहे. या रस्त्याच्या विस्तारीकरणात एक हजार ४० झाडे बाधित होणार आहेत. ही झाडे तोडण्याची परवानगी राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे मागितली आहे.
मुरलीधर भवार
कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रोड सहापदरी होणार आहे. या रस्त्याच्या विस्तारीकरणात एक हजार ४० झाडे बाधित होणार आहेत. ही झाडे तोडण्याची परवानगी राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे मागितली आहे. त्यावर, महापालिकेने सात दिवसांत हरकती व सूचना मागवल्या आहेत. परंतु, त्या न आल्यास महापालिका महामंडळास झाडे तोडण्याची परवानगी काही अटी-शर्तींना अधीन राहून देणार आहे.
मुंबई-नाशिक आणि मुंबई-पुणे-बंगळुरू महामार्गाला तसेच नवी मुंबईला जोडणारा रस्ता म्हणून भिवंडी-कल्याण-शीळ रस्ता महत्त्वाचा आहे. हा रस्ता विकसित करण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने भिवंडी-कल्याण-शीळ कंपनीला दिले होते. हा रस्ता २००८ मध्ये खुला झाला. या रस्त्यालगतच्या पादचारी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील पेव्हरब्लॉक, दुभाजकांवरील झाडांच्या कुंड्या खराब झालेल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा कचरा फेकला जातो. केडीएमसीच्या हद्दीतील भागांत अनेक ठिकाणी पथदिवेही सुरू नाहीत. टोलवसुली करूनही रस्त्याची देखभाल-दुरुस्ती योग्य प्रकारे केली जात नसल्याची तक्रार अनेकांकडून केली जात आहे. या रस्त्याच्या दुतर्फा नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण केले आहे. सध्या ही झाडे बहरली असून त्यांना प्रतिष्ठानचे सेवेकरी दररोज पाणी घालतात.
राज्य रस्ते विकास महामंडळाने सध्या हा रस्ता सहापदरी करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी त्यांनी भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील देसाईखाडी ते दुर्गाडी किल्ल्यादरम्यान असलेली एक हजार ४० झाडे तोडण्याची परवानगी केडीएमसीच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे मागितली आहे. त्यामुळे महापालिकेने यासंदर्भात एक नोटीस जाहीर केली आहे. त्यात महापालिकेने झाडे तोडण्यासंदर्भात हरकती-सूचना असल्यास त्या सात दिवसांत नोंदवण्याचे आवाहन केले आहे. हरकती-सूचना न आल्यास एक हजार ४० झाडे तोडण्याची परवानगी महामंडळास दिली जाणार आहे. मात्र, ही परवानगी सशर्त अटींनुसार असेल. एक झाड तोडल्याच्या बदल्यात महामंडळास नियमानुसार पाच झाडे लावावी लागतील. झाडे मोठी असल्याने ती पुनर्राेपण करण्याची परवानगी दिली जाईल. त्यामुळे महामंडळास शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण करणे भाग आहे.
।विकास झाडांच्या मुळावर
विकासामुळे वनराईवर कुºहाड येत असल्याचा प्रत्यय भिवंडी-कल्याण-शीळ रोडच्या सहापदरीकरणाच्या निमित्ताने आला आहे.
ठाकुर्लीतील बाराबंगला परिसरातील रेल्वेच्या जागेतील एक हजार ६४ झाडे यापूर्वी तोडण्यात आली. तेथे रेल्वेच्या सुरक्षा बलाने परेड ग्राउंड बनवण्यासाठी झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती.
झाडे तोडण्यास तत्कालीन नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी विरोध केला होता. त्याला वृक्ष समितीत स्थगिती दिली होती. रेल्वे सुरक्षा बलास छावणीलगत परेड ग्राउंड विकसित करायचे होते. त्यासाठी जागेची निकड लक्षात घेऊन महापालिकेने झाडे तोडण्याची परवानगी दिली.
दरम्यान, रेल्वेने सुरक्षा बलाने तेथे तोडलेल्या झाडांच्या बद्दल्यात झाडे लावली.