भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:41 AM2021-04-01T04:41:54+5:302021-04-01T04:41:54+5:30
भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असतानाच आता भिवंडी-कल्याण-शीळ ...
भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असतानाच आता भिवंडी-कल्याण-शीळ या रस्त्याच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा व मनमानी कारभार केला असून, या रस्त्याचे कामही निकृष्ट केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष परेश चौधरी यांनी केला आहे तसेच कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे.
निकृष्ट कामाचे पुरावेही चौधरी यांनी मुख्य अभियंता यांना देऊनसुद्धा कंत्राटदारावर कोणतीच कारवाई होत नसल्याने मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना महामंडळाचे मुख्य अभियंता यांच्या नावाने नामकरण करण्यात येणार असून, त्यासाठी चौधरी यांनी खुद्द मुख्य अभियंता यांनाही निमंत्रण दिले आहे.
या सहापदरी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या काँक्रिटीकरणाबाबत आपण अनेकवेळा तक्रार केली होती. या रस्त्याबाबत केलेल्या तक्रारींवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. याउलट कंत्राटदारावर मेहेरनजर करीत या निकृष्ट बांधकामावर एक प्रकारे पांघरूण घालण्याचे काम महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. विशेष म्हणजे या काँक्रिट रस्त्यावर एक मीटर लांबीचा खड्डा पडला आहे.