कपिल पाटील यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; भिवंडीत महायुतीतील वाद उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 07:01 PM2024-04-06T19:01:27+5:302024-04-06T19:03:10+5:30
Loksabha Election 2024; भिवंडीत शिवसेनेने निवडणूक लढवावी, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी
ठाणे - भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपाचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांना शिवसैनिकांनी विरोध केला आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्याने ही जागा शिवसेनेला द्यावी, अशी मागणी मुरबाड, वाडा, शहापूर, कल्याण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भिवंडीची उमेदवारी शिवसेनेलाच मिळावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्याचे शिवसेना ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी सांगितले.
गेल्या दोन निवडणुकीत शिवसैनिकांनी भाजपचे खासदार कपिल पाटील यांना निवडून दिले आहे. मुरबाड, भिवंडी, वाडा, शहापूर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये खासदार कपिल पाटील यांच्याबाबत तीव्र नाराजी आहे. निवडणूक झाली की खासदार पाटील शिवसैनिकांना बाजूला करतात. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश पाळतो. निवडणुकीत युती धर्म पाळतो. मात्र खासदारांनी मागील १० वर्ष आम्हाला विश्वासात घेतले नाही अशी खदखद यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.
‘भिवंडी मतदारसंघात शिवसेनेच्या जीवावर मी खासदार झालोय’, हे कपिल पाटील यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष ठाणे जिल्ह्यात वाढला. भिवंडी मतदार संघात २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसैनिकांनी युतीचा धर्म पाळून कपिल पाटील यांच्या विजयासाठी काम केले. मात्र निवडून आल्यानंतर खासदारांनी इथल्या शिवसैनिकांची कामे केली नाही. विकास निधी दिला नाही. याउलट शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न केल्याचं मारुती धिर्डे यांनी सांगितले. मागील दोनवेळा विधानसभा निवडणुकीत भिवंडी पूर्व आणि शहापूरमधील शिवसेना उमेदवारांचा पराभव करण्यात आला. त्यामुळे येथील शिवसैनिकांच्या मनात खासदार कपिल पाटील यांच्याबाबत प्रचंड नाराजी आहे. खासदार कपिल पाटील यांची उमेदवारी धोक्यात आहे. त्यामुळे शिवसेनेने भिवंडी निवडणूक लढवावी, अशी विनंती मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसैनिकांनी त्यांच्या नेत्यांकडे प्रयत्न करावा, भिवंडी लोकसभा मिळवून घ्यावी आमचा त्यांना विरोध आहे का? निर्णय करणारा मी नाही. महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित बसून ही उमेदवारी जाहीर केली. चर्चा करून निर्णय घेतला आहे. आता जर शिवसैनिकांना वाटत असेल त्यांनी लढावं तर गैर काही नाही. जी काही नाराजी आहे ती वरिष्ठांकडे मांडावी किंवा माझ्याशी बोलावं. कालपर्यंत धिर्डे आमच्या प्रचाराला फिरत होते. संवाद मेळावा घेतला त्यातही ते होते. नाराजी असती तर मेळाव्याला आले नसते. मागच्या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेने पुढाकार घेऊन काम केलंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शब्द प्रमाण मानून ते पुन्हा कामाला लागतील असा विश्वास भिवंडीचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी बोलून दाखवला.