भिवंडीत मेट्रो हॉटेल ते म्हाडा कॉलनी रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन संपन्न
By नितीन पंडित | Published: July 18, 2024 04:31 PM2024-07-18T16:31:13+5:302024-07-18T16:31:43+5:30
मेट्रो हॉटेल ते म्हाडा कॉलनी रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून याच रस्त्यावर होलसेल भाजीपाला मार्केट सकाळी भरत असतो, त्यामुळे या होलसेल भाजीपाला मार्केटमधून भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात शहर व ग्रामीण भागातून नागरिक या ठिकाणी येत असतात.
भिवंडी: शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असल्याने व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पश्चिमचे भाजप आमदार महेश चौघुले यांच्या प्रयत्नाने वांजरपट्टी मेट्रो हॉटेल ते म्हाडा कॉलनी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ व भूमीपूजन सोहळा गुरुवारी पार पडला. यावेळी आमदार महेश चौघुले, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी,स्थानिक नागरिक व महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेट्रो हॉटेल ते म्हाडा कॉलनी रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून याच रस्त्यावर होलसेल भाजीपाला मार्केट सकाळी भरत असतो, त्यामुळे या होलसेल भाजीपाला मार्केटमधून भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात शहर व ग्रामीण भागातून नागरिक या ठिकाणी येत असतात. मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे भाजीपाला नेताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांच्या या समस्येची दखल भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश चौघुले यांनी घेत या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १८ कोटींचा निधी मंजूर केला असून गुरुवारी या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
या रस्त्यावर भाजी मार्केट भरत असून रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहत तसेच अपघातही मोठ्या प्रमाणात होत असून काँक्रेट रस्ता झाल्यावर वाहतूक सुरळीत होईल तसेच अपघाताचे प्रमाणही कमी होईल अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार महेश चौघुले यांनी दिली आहे.