भिवंडीत आमदार रईस शेख यांनी मुलांसोबत जमिनीवर बसून मनपा अधिकाऱ्यांची घेतली शाळा
By नितीन पंडित | Published: November 22, 2022 06:44 PM2022-11-22T18:44:29+5:302022-11-22T18:45:29+5:30
विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे मनपा प्रशासनाचे वेधले लक्ष
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: भिवंडी मनपा शाळा इमारतींची सध्या दुरवस्था झालेली असतानाच या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता बसण्यासाठी बेंच नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. असे असताना शाळेच्या पाहणीसाठी गेलेले आमदार रईस शेख यांनी विद्यार्थ्यांसोबतच जमिनीवर बैठक मारत महापालिका अधिकाऱ्यांचीच शाळा घेतली आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे मनपा प्रशासनाचे मंगळवारी लक्ष वेधले.
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील शांतीनगर येथील एकाच शाळा इमारतीमध्ये दोन सत्रात तब्बल तेरा शाळा भरत असून येथे ५२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बेंच नसल्याने व खाली जमिनीवर बसण्यासाठी चटई नसल्याने विद्यार्थी जमिनीवर बसतात.भिवंडी पूर्व विधानसभा आमदार रईस शेख हे आपल्या कार्यकर्त्यांसह या शाळांच्या पाहणीसाठी गेले असता हे विदारक चित्र पाहून त्यांनी या बाबीची गंभीर दखल घेत मुलांसोबत जमिनीवर बैठक मारली.त्या नंतर तात्काळ पालिका शहर अभियंता सुनील घुगे व शिक्षण विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर यांना शाळेत बोलावून घेत त्यांना सुद्धा मुलांसोबत जमिनीवर बसवून त्यांची शाळा घेतली.
पालिका प्रशासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना शाळा इमारती व शाळा व्यवस्थाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे सांगत रईस शेख यांनी पालिका शाळांमधून भिवंडी शहरातील कामगार गरीब वर्गाच्या कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना सुविधा देण्यात पालिका हात आखडता घेत असल्याचा आरोप आमदार शेख यांनी केला आहे.
या प्रकारानंतर पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या सोबत झालेल्या चर्चेत आयुक्तांनी येत्या तीन महिन्यात एक हजार बेंच शाळांना उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली असून तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या बैठकीची तात्पुरती व्यवस्था म्हणून बैठक चटई आमदार रईस शेख यांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्या आहेत.