Bhiwandi: भिवंडीतील बाधीत परिवारांची खासदार बाळ्या मामा यांनी घेतली भेट
By नितीन पंडित | Published: June 29, 2024 07:35 PM2024-06-29T19:35:39+5:302024-06-29T19:36:39+5:30
Bhiwandi News: भिवंडी महापालिकेने भर पावसात रस्ता रुंदीकरणाच्या नावाने नागरिकांची ९ घरे तोडून टाकल्याचा अजब प्रकार भिवंडीत घडला आहे.या ९ घरातील नऊ कुटुंबियांवर भर पावसात रस्त्यावर ताडपत्री टाकून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
- नितीन पंडित
भिवंडी - भिवंडी महापालिकेने भर पावसात रस्ता रुंदीकरणाच्या नावाने नागरिकांची ९ घरे तोडून टाकल्याचा अजब प्रकार भिवंडीत घडला आहे.या ९ घरातील नऊ कुटुंबियांवर भर पावसात रस्त्यावर ताडपत्री टाकून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या बाधीत परिवारांची भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शनिवारी भेट घेतली.यावेळी भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले व माजी नगरसेवकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या धोबी तलाव,रोशन बाग परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले असून या रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोहम्मद रमजान अब्दुल रहीम यांच्यासह इतर ८ अशा नऊ घरांना महापालिका प्रशासनाने २२ मे २०२४ रोजी नोटीस बजावत रस्ता रुंदीकरणात बाधित मिळकतीचा मोबदला निश्चित करण्यासाठी महापालिकेकडे कागदपत्र सादर करण्यासाठी नोटीस दिली होती. मात्र अवघ्या एक महिन्यांच्या नोटीस कालावधीतच मनपाने मोहम्मद रमजान अब्दुल रहीम यांच्यासह इतर आठ नागरिकांची घरे भर पावसात तोडली आहेत.हि घरे तोडतांना मनपा प्रशासनाने येथील नागरिकांना कोणताही मोबदला दिला नाही व त्यांच्या राहण्याची कोणतीही सुविधा केली नसल्याने या कुटुंबियांना भर पावसात आपल्या परिवारासह बाहेर राहण्याची वेळ आली आहे.
या बाधीत नागरिकांची शनिवारी खासदार बाळ्या मामा त्यांनी भेट घेऊन रस्ता रुंदीकरण व शहर विकास होणे गरजेचे आहे मात्र भर पावसात नागरिकांच्या राहत्या घरांवर बुलडोझर चालवून व नागरिकांना बेघर करून त्यांना रस्त्यावर आणने चुकीचे आहे.या नागरिकांसाठी मनपाने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते,याविषयावर मनपा आयुक्तांशी फोनवर चर्चा झाली असून सोमवारी यावर मार्ग काढण्यात येईल अशी प्रतिक्रिया खासदार बाळ्या मामा यांनी यावेळी दिली आहे.