भिवंडी मनपा प्रशासनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; 'बोनस' वरून कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

By नितीन पंडित | Published: November 7, 2023 06:11 PM2023-11-07T18:11:50+5:302023-11-07T18:14:33+5:30

भिवंडी मनपाच्या प्रशासनात आणि लेबर फ्रंट युनियनच्या कामगारांमध्ये श्रेयवादाची लढाई

Bhiwandi municipal administration is likely to increase in difficulty; Employees warn of agitation over 'bonus' | भिवंडी मनपा प्रशासनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; 'बोनस' वरून कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

भिवंडी मनपा प्रशासनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; 'बोनस' वरून कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

नितीन पंडित,लोकमत न्यूज, नेटवर्क,भिवंडी: दिवाळी हा संपूर्ण वर्षभरातील महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो.त्यासाठी यंदा भिवंडी महापालिकेने कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान १३ हजार ५०० रुपये जाहीर केला.महापालिकेच्या या निर्णयाचा कामगारांकडून निषेध करण्यात येत आहे.मात्र ही रक्कम अपुरी आहे,शिवाय मनपा कामगारांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं मनपा कर्मचाऱ्यांचं मत आहे.  केवळ भाजप आमदार व काही कामगार संघटनांना हाताशी धरून कामगारांवर अन्याय करणारी आहे असा आरोप कामगारांनी केला आहे.

लेबर फ्रंट युनियनचे भिवंडी मनपा अध्यक्ष किरण चन्ने यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनपा प्रशासनाच्या या मनमानी कारभारा विरोधात गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी लेबर फ्रंट युनियनच्या वतीने भिवंडी प्रांत कार्यालयासमोर धिक्कार मोर्चा आंदोलन कण्यात येणार असल्याची माहिती दिली .या प्रसंगी मनसे महानगरपालिका कामगार संघटनेचे संतोष साळवी,अखिल भारतीय मजदुर काँग्रेस संघटनेचे राजू चव्हाण, लेबर फ्रंटचे संतोष चव्हाण ,चंद्रकांत सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.त्यामुळे मनपा प्रशासनाच्या कार्यव्यवस्थेवर एकंदरीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

 कामगार संघटनांच्या कृती समिती सोबत १ नोव्हेंबर रोजी चर्चेत कामगार संघटनांनी १५ हजार २०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. ती चर्चा फिस्कटल्या नंतर दोन दिवसात पुन्हा चर्चा करू असे ठरले असताना पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी परस्पर मर्जीतल्या कामगार संघटना व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून हा अयोग्य निर्णय घेतला असल्याचेही चन्ने यांनी यावेळी सांगितले.पालिका आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाचा सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात येत आहे.

  भिवंडी  मनपाच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात कामगारांसाठी ४ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे कामगारांना ११ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान दिले होते.तर यावर्षी अर्थसंकल्पात ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे पालिकेतील ४२२५ कामगारांकरिता १४ हजार २०० रुपयांची तरतूद केली आहे. यंदा त्यामध्ये केवळ एक हजार रुपये वाढ करण्यात आली आहे.त्यावर मनपा कर्मचाऱ्यांनी १५ हजार २०० रुपयांची मागणी केली असताना मनपा प्रशासन आणि  लेबर फ्रंट युनियनच्या कामगारांमध्ये श्रेय वादाची लढाई पाहायला मिळाली. काही लोकप्रतिनिधी यांनी पालिकेच्या निर्णयास सहमती दर्शवली, उलट त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहणे अपेक्षित असताना त्यांनी प्रशासनाच्या सोबतीने कामगारांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप यावेळी किरण चन्ने यांनी केला आहे.या विरोधात कामगार आक्रमक असून गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढून पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला जाईल असेही चन्ने यांच्याकडून सांगण्यात आले.

 

Web Title: Bhiwandi municipal administration is likely to increase in difficulty; Employees warn of agitation over 'bonus'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.