भिवंडी मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; स्वागत कमानीची लादी पडून ४ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
By नितीन पंडित | Published: December 3, 2022 08:26 PM2022-12-03T20:26:16+5:302022-12-03T20:27:02+5:30
शहरातील न्यु टावरे कंपाऊंड येथील पालिका शाळा क्रमांक ७२ समोर स्वागत कमान असून त्यास संगमरवरी लाद्या लावण्यात येत आहेत.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: भिवंडी शहरातील न्यू टावरे कंपाऊंड नारपोली या ठिकाणी महापालिका शाळेसमोर असलेल्या स्वागत कमानीला लावलेली लादी कोसळून झालेल्या दुर्घटनेत परिसरात खेळत असलेल्या एका चार वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे.आयुष कुमार शंकर प्रसाद कुशवाह वय ४ वर्ष असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.
शहरातील न्यु टावरे कंपाऊंड येथील पालिका शाळा क्रमांक ७२ समोर स्वागत कमान असून त्यास संगमरवरी लाद्या लावण्यात आला आहेत.त्याठिकाणी परिसरातील आयुष कुमार शंकर प्रसाद कुशवाह हा बालक कमानी भवती खेळत असताना अचानक भली मोठी संगमरवरी लादी कोसळून आयुषकुमार याच्या डोक्यात पडल्याने तो बेशुद्ध पडला .या दुर्घटने नंतर बालकास घेऊन त्याची आई आयजीएम रुग्णालयात दाखल झाली परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.या घटने बाबत महानगरपालिका प्रशासन अनभिज्ञ असून घटने नंतर चार तासा नंतरही पालिका प्रशासन कडून घटनास्थळी कोणीही फिरकले नसल्याने पालिकेचया या हलगर्जी कारभाराचा नावरीकांनी तीव्र निषेध केला आहे.
सदर शाळे समोर स्वागत कमान १४ वर्षां पूर्वी बनविण्यात आली असून स्वागत कमानी वरील अनेक लाद्या निखळून पडल्या आहेत .तर याच ठिकाणी शाळा असल्याने अपघात घडू शकतो या बाबत शाळा शिक्षकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनकडे तक्रार करवून लाद्या काढून टाकण्याची मागणी केली परंतु त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या चिमुरड्याच्या अपघाती मृत्यूस पालिका जबाबदार असल्याचा आरोप माजी नगरसेवक भगवान टावरे यांनी केला आहे .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"