भिवंडी मनपा प्रशासनाची कचरा ठेकेदारावर मेहरबानी; कोट्यावधींचा खर्च, तरीही ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग
By नितीन पंडित | Published: October 9, 2023 04:21 PM2023-10-09T16:21:10+5:302023-10-09T16:21:59+5:30
घंटागाड्या या डंपिंग ग्राउंडवर जाऊ शकत नसल्याने घंटागाड्या मधील कचरा संकलन करण्यासाठी पालिकेने प्रभाग समिती निहाय पाच ठिकाणे ठेकेदाराला सुचवली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी शहरात स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला असून शहर स्वच्छतेबाबत मनपा प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे.विशेष म्हणजे कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर मेहरबानी म्हणून कोट्यवधींची यंत्रसामुग्री एक रुपया भाड्याने आंदण देऊनही ठेकेदारावर कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. शहरात मुख्य रस्त्यांबरोबरच अनेक ठिकाणी हिंदू व मुस्लिम भागात ठीकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. भिवंडी मनपा कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर महिन्याला पावणेदोन कोटी रुपये खर्च करत असतानाही शहरातील कचरा समस्या गंभीर बनली आहे.
शहरात दररोज साडेचारशे टन कचरा उचलला जात असून हा कचरा उचलण्यासाठी मनपा प्रशासने आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट् प्रा. लि.या कंपनीस प्रति टन १२२९ रुपये दर निश्चित करून सहा वर्षांसाठी ठेका दिला आहे.यासाठी ठेकेदाराला सुमारे २२ कोटी ७५ लाख ७४ हजार ५२७ रुपये वार्षिक दिले जाणार आहेत.यासाठी मनपाने ठेकेदाराला ५० घंटागाड्या व २३ रेफ्युज कलेक्टर अशी सुमारे १० कोटी रुपयांची वाहनेनाममात्र १ रुपया प्रतिमहा भाडयाने ठेकेदाराला आंदण दिली आहेत.
घंटागाड्या या डंपिंग ग्राउंडवर जाऊ शकत नसल्याने घंटागाड्या मधील कचरा संकलन करण्यासाठी पालिकेने प्रभाग समिती निहाय पाच ठिकाणे ठेकेदाराला सुचवली होती.मात्र या ठिकाणी ठेकेदाराकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने ही कचरा संकलन केंद्र अक्षरशः उकिरडे झाले.त्यांनतर जनाक्रोश वाढल्याने काही ठिकाणी कचरा संकलन बंद करण्यात आली मात्र खडक रोड येथील कचरा संकलन हे मुख्य बाजारपेठेत चहूबाजूने निवासी व व्यापारी अस्थापनांच्या मधोमध आहे. येथे कचरा संकलन केंद्राला डम्पिंगचे स्वरूप आले असून दुर्गंधीने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील भिवंडी कल्याण या मुख्य रस्त्यावर नवी वस्ती जवळ असलेल्या वेलकम हॉटेलसमोर कचऱ्याचा भयंकर ढिग साचला असून शहरात अंतर्गत रस्त्यावर कचऱ्याचे ढिग मोठ्या प्रमाणात साचले आहेत.या कचरा कोंडीमुळे शहरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सध्या नवरात्रीउत्सव तोंडावर आला असतांनाच एन सणाच्या पार्श्वभूमीवर तरी महापालिका नागरिकांच्या आरोग्य समस्याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिक विचारत आहेत.