भिवंडी महापालिका आयुक्तांचा त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर; नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात मनपा प्रशासन कटिबद्ध
By नितीन पंडित | Published: July 17, 2023 06:28 PM2023-07-17T18:28:27+5:302023-07-17T18:28:38+5:30
भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य यांनी चार दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे.
भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदी अजय वैद्य यांनी चार दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी महापालिकेतील कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशीही मुख्य कार्यालय सुरू ठेवून विविध कार्यालयांच्या कामांचा आढावा घेत महापालिका प्रशासनाचे कार्य अधिक प्रभावीशाली व गतिमान होण्यासाठी नवनियुक्त मनपायुक्तांनी त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमाची माहिती आयुक्त वैद्य यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,उपायुक्त दीपक झिंजाड जण संपर्क अधिकारी सुनील झळके उपस्थित होते.
गतिमान प्रशासन,लोकाभिमुख प्रशासन व जबाबदार प्रशासन या त्रिसूत्रीचा वापर आपल्या प्रशासकीय सेवेत करणार असल्याचे आयुक्त वैद्य यांनी जाहीर केले असून मनपाच्या प्रशासकीय कामांना गती देण्याचे काम या माध्यमातून होणार असून लोकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी व नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा देण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असून त्यासाठी नागरिकांनीही महापालिकेचे कर वेळेवर भरणे गरजेचे असल्याने जाबाबदर नागरिक व जबाबदार प्रशासन अशा त्रिसूत्रीचा अवलंब आयुक्त वैद्य यांनी केला असून या माध्यमातून शहर विकास साधण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध राहील असेही मनपा आयुक्तांनी यावेळी जाहीर केले.
शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा महत्वाचा असून रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील मनपा प्रशासनाने सुमारे ४० हजार स्के.फूट हुन अधिक अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत अन्यथा अशा अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन देखील आयुक्तांनी यावेळी नागरिकांना केले आहे.
या त्रिसूत्री कार्यक्रमाबरोबरच आयुक्त आपल्या दारी हा नावीन्यपूर्ण उपक्रम आपण हाती घेतला असून मनपाच्या पाचही प्रभागांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्रत्यक्ष नागरिकांच्या समस्या नागरिकांपर्यंत पोहोचून सोडविण्याचे प्रयत्न आपण स्वतः करणार असल्याचेही आयुक्त वैद्य यांनी यावेळी सांगितले असून मनपा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना मानसिक व शारीरिक त्रास व ताण पडत असल्याने सेवाभावी संस्थांच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.तर शहरातील स्वच्छता, कचरा, खड्डेमय रस्ते,व पाण्याच्या समस्यां याबाबत लवकरच आढावा बैठका घेऊन नागरिकांना मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आयुक्त वैद्य यांनी यावेळी दिली.