भिवंडी महापालिकेचा अर्थसंकल्प महासभेत सादर; आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा २० कोटींनी अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 08:31 PM2022-03-30T20:31:12+5:302022-03-30T20:32:04+5:30

या अर्थसंकल्पात एकूण महसूल उत्पन्नातून बांधील खर्च वजा करता उर्वरीत रक्कमेवर ५ टक्के रक्कम विविध घटकांसाठी राखून ठेवण्यात आली आहे त्यामध्ये दुर्बल घटक, महिला व बाल कल्याण, अंध दिव्यांगांसाठी प्रत्येकी ८६ लाख ३० हजार रक्कम तरतूद करण्यात आली आहे.

Bhiwandi Municipal Corporation budget presented in general body meeting; 20 crore more than the budget presented by the Commissioner | भिवंडी महापालिकेचा अर्थसंकल्प महासभेत सादर; आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा २० कोटींनी अधिक

भिवंडी महापालिकेचा अर्थसंकल्प महासभेत सादर; आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा २० कोटींनी अधिक

googlenewsNext

नितिन पंडीत - 

भिवंडी -
भिवंडी महापालिकेचा २०२२ - २३ या आर्थिक वर्षाचा ८४२ कोटी २९ लाख ४७ हजार रुपये रक्कमेचा अर्थसंकल्प बुधवारी झालेल्या विशेष अर्थसंकल्पीय महासभेत स्थायी समितीचे सभापती संजय म्हात्रे यांनी महापौर प्रतिभा पाटील यांच्याकडे सादर केला. विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात मनपा आयुक्तांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता ८२२ कोटी ४३ लाख ३२ हजार रुपयांचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले होते. मनपा आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये स्थायी समितीने तब्बल २० कोटी रुपयांची वाढ केली आहे. 

यात महापौर निधी २ कोटी, उपमहापौर निधी ५० लाख रुपये, स्थायी समिती सभापती निधी ५० लाख, एक ते पाच समिती सभापतींना प्रत्येकी एक कोटी निधी, नगरसेवक निधी ८ कोटी ९५ लाख १६ हजार तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुनर्बांधणी व सुशोभीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी, अशी २० कोटी रुपयांच्या निधीची वाढ करण्यात आली आहे. 

या विशेष अर्थसंकल्पीय महासभेस मनपा आयुक्त सुधाकर देशमुख , अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे , सभागृह नेता सुमित पाटील, उपमहापौर इम्रानवली मोहम्मद खान, सचिव अनिल प्रधान, शहर अभियंता एल पी गायकवाड ,मुख्य लेखा परीक्षक श्रीकांत अनारसे, जन संपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांच्यासह मनपा अधिकरी व नगरसेवक उपस्थित होते. 

या अर्थसंकल्पात एकूण महसूल उत्पन्नातून बांधील खर्च वजा करता उर्वरीत रक्कमेवर ५ टक्के रक्कम विविध घटकांसाठी राखून ठेवण्यात आली आहे त्यामध्ये दुर्बल घटक, महिला व बाल कल्याण, अंध दिव्यांगांसाठी प्रत्येकी ८६ लाख ३० हजार रक्कम तरतूद करण्यात आली आहे. रस्ते व पदपाथ दुरुस्तीसाठी ९ कोटी, मनपा इमारती दुरुस्तीसाठी ५ कोटी ६८ लाख ९७ हजार, वार्षिक निविदा रोड मटेरिअल, चेंबर कव्हर साठी ३ कोटी ७५ लाख ८७ हजार, मनपा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट ३ कोटी, दिवाबत्ती दुरुस्ती व देखभालीसाठी २ कोटी, जंतूनाशक व इतर वस्तू खरेदीसाठी २ कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी १५ कोटी ,निवडणूक खर्चासाठी १० कोटी, मनपा इमारत बांधण्यासाठी ३ कोटी ६० लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे. तर नविन रस्ते व फुटपाथ बांधण्यासाठी ५ कोटी ७४ लाख , तर नाले व गटार दुरुस्तीसाठी ३ कोटी ९० लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.
 

Web Title: Bhiwandi Municipal Corporation budget presented in general body meeting; 20 crore more than the budget presented by the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.